सांगली : राज्यातील खासगी शाळांच्या मेस्टा या संघटनेने कोरोना व लॉकडाऊनमुळे शालेय शुल्कामध्ये २५ टक्के सवलतीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाशी जिल्ह्यातील कोणाही शाळा सहमत नाही, त्यामुळे शुल्कात सवलत दिली जाणार नाही, असे इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनने जाहीर केले आहे.
संघटनेच्या सदस्यांची बैठक सांगलीत झाली. यावेळी विविध इंग्रजी शाळांच्या प्रतिनिधींनी भूमिका मांडल्या. अध्यक्ष बाहुबली कबाडगे, कपिल रजपूत, समीर बिरनाळे, शरद पाटील, संदीप राऊत, अजित कुलकर्णी, नेहा फडके, दीपेन देसाई, पद्मा मिणचे, ख्रिस्तीना मार्टीन, जे. एम. जमादार, रॉबिन बी, दिलीप सबस्टीन, जे. एस. बोबडे, अंजुम जमादार, रितेश सेठ, अभय सातपुते यासह शाळांचे संचालक उपस्थित होते.
त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील कोणतीही शाळा मेस्टा संघटनेशी संलग्न नाही. त्यामुळे त्यांचा २५ टक्के सवलतीचा निर्णय आम्हाला मान्य नाही. जिल्ह्यातील शाळांनी आपापल्या परीने सवलती देण्याचा प्रयत्न यापूर्वीच केला आहे. मागील वर्षीही सवलती दिल्या आहेत. प्रत्येक शाळांमधील सुविधांचा खर्च वेगवेगळा आहे. गेल्यावर्षीपासून अत्यंत चांगल्या पद्धतीने ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. शिक्षकांना त्यासाठी प्रशिक्षण घ्यावे लागले आहे. शाळांमध्ये ऑनलाईन सुविधा उपलब्ध कराव्या लागल्या आहेत. या स्थितीत शुल्कामध्ये सवलतीचा निर्णय त्या-त्या शाळांनी घ्यावा.
संचालकांनी सांगितले की, कोणाच्याही दबावाखाली सवलतीचा निर्णय घेतला जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान शाळांनी ठेवला आहे.
चौकट
पालकांकडून पत्रे घेणार
ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थी तयार असल्याबाबतचे पत्र प्रत्येक शाळेने पालकांकडून घ्यावे. शाळांनी पाल्याला ऑनलाईन शिक्षण द्यावे, अशी विनंतीही पालकांकडून लेखी स्वरूपात घ्यावी, अशी सूचना संघटनेने सर्व शाळांना केली. त्यानुसार आता पालकांकडून पत्रे घेतली जाणार आहेत.