मृत्यूनंतरही संपत नाही त्यांचे बेवारसपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:28 AM2021-03-09T04:28:42+5:302021-03-09T04:28:42+5:30

सांगली : रेल्वेच्या धडकेत मरण पावलेल्या ४३ जणांची मृत्यूनंतरही आपल्या नातेवाइकांची प्रतीक्षा थांबलेली नाही. बेवारस मयत म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर ...

Their indifference does not end even after death | मृत्यूनंतरही संपत नाही त्यांचे बेवारसपण

मृत्यूनंतरही संपत नाही त्यांचे बेवारसपण

Next

सांगली : रेल्वेच्या धडकेत मरण पावलेल्या ४३ जणांची मृत्यूनंतरही आपल्या नातेवाइकांची प्रतीक्षा थांबलेली नाही. बेवारस मयत म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले असले तरी त्यांनीही अद्याप आशा सोडलेली नाही.

जिल्ह्यात पुणे, कोल्हापूर, बंगळुरू आणि सोलापूर या चार मार्गांवर रेल्वे धावतात. त्यांच्या संपूर्ण कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यावर आहे. अगदी साताऱ्यापर्यंतचा लोहमार्ग सांभाळावा लागतो. दररोज ७५ हून अधिक प्रवासी गाड्या व तीस ते चाळीस मालगाड्या धावतात. वाहतूक मोठी असल्याने रेल्वेच्या धडकेत मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे. सरासरी आठवड्याला एक किंवा दोन मृत्यू होतात. त्यातील बहुतांश जणांची ओळख पटते, पण अनेक जण आपली ओळख न सांगताच जगाचा निरोप घेतात. त्यांची ओळख पटविण्यासाठी पोलीस शेवटपर्यंत प्रयत्न करतात.

यातूनच काही आठ‌वड्यांपूर्वी एका मृताच्या नातेवाइकाचा शोध लागला. २०१८ मध्ये रेल्वेच्या धडकेत तो मरण पावला होता. पोलिसांनी ओळख पटविण्याचा बराच खटाटोप केला, पण थांग लागला नाही. अखेर स्वत:च अंत्यसंस्कार केले. दोन वर्षांनी म्हणजे २०२० मध्ये कागवाड पोलीस ठाण्यात एक बेपत्ताची नोंद झाली होती. तक्रारीतील वर्णन मृताशी मिळतेजुळते होते. मिरज पोलिसांनी त्याआधारे शोध घेतला असता रायबाग येथे नातेवाईक मिळून आले. पोलिसांनी मृताच्या वस्तू, छायाचित्रे नातेवाइकांच्या हवाली केली. मृत्यूनंतर का होईना, पण त्याचे बेवारसपण संपविण्यात पोलिसांना यश मिळाले.

चौकट

४३ मृतांना अजूनही नातेवाइकांचा शोध

- मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यांतर्गत २०१९ मध्ये १०६ जण रेल्वेच्या धडकेत मरण पावले, २०२० मध्ये ही संख्या ४५ होती. एकूण १५१ मृतांपैकी ४३ जणांची ओळख अजूनही पटलेली नाही.

- अर्थात यातील बहुतांश भिकारी आणि निराधार आहेत. त्यांची ओळख पटविण्यासाठी रेल्वे पोलीस जंगजंग पछाडतात. मृतांच्या छायाचित्रांची प्रदर्शने वर्षातून एक-दोनदा भरवली जातात. कार्यक्षेत्रात ठिकठिकाणी छायाचित्रे चिटकवली जातात. महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध पोलीस ठाण्यांतील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेऊन त्याआधारे नातेवाइकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो.

पॉइंटर्स

२०१९ मध्ये मृत्यू - १०६

अद्याप बेवारस - ३२

२०२० मध्ये मृत्यू - ४५

अद्याप बेवारस - ११

कोट

रेल्वेच्या हद्दीत मरण पावलेल्या अनोळखींवर आम्हीच अंत्यसंस्कार करतो. त्याचा खर्च रेल्वे देते. मृतांची ओळख पटविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. मृतांच्या छायाचित्रांची प्रदर्शने भरवली जातात

- सत्यजीत आदमाने, पोलीस निरीक्षक, लोहमार्ग पोलीस ठाणे, मिरज

Web Title: Their indifference does not end even after death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.