इस्लामपूर : संपूर्ण शहरात पोलिसांनी लावलेल्या सीसीटीव्हीच्या तिसऱ्या डोळ्याला चकवा देण्यासाठी चोरट्यांनी आता त्याच्या कक्षेबाहेरचा परिसर निवडत चोऱ्या करण्याचा सपाटा लावला आहे. नवे-जुने खेड रस्त्यावरील एका शेतातील ठिबक सिंचनाच्या १० हजार रुपये किमतीच्या पाइप आणि दत्त टेकडी परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या खोलीतून १४ हजार रुपयांच्या वायरच्या बंडलांची चोरी झाली.
विश्वास राजाराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत त्यांचे नवे-जुने खेड रस्त्यालगत शेत आहे. या शेतात त्यांनी पिकांसाठी ठिबक सिंचन केले आहे. चोरट्यांनी १२ ते १६ ऑगस्ट यादरम्यान त्यांच्या शेतातील ३३ सरींमधील १० हजार रुपये किमतीच्या पाइपची चोरी केली.
मकरंद राजाराम पाटील यांच्या इमारतीचे बांधकाम दत्त टेकडी परिसरात सुरू आहे. तळमजल्यावर साहित्य ठेवण्याची खोली आहे. चोरट्यांनी खोली उघडी असल्याचा फायदा उठवत गुरुवारी रात्री ते पहाटेदरम्यान तेथील १३ हजार ६२० रुपये किमतीच्या इलेक्ट्रिक वायरची चोरी केली. दोन्ही घटनांची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.