प्रताप महाडिककडेगाव : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या पाणी वितरण व्यवस्थेत ऐतिहासिक सुधारणा केली जात आहे. पारंपरिक उघड्या पद्धतीच्या मुख्य व शाखा कालव्यांवरील वितरण प्रणालीला बंदिस्त नलिकांमध्ये रुपांतरीत करण्यात येणार आहे. या योजनेच्या २५,००० हेक्टर क्षेत्रासाठी बंदिस्त नलिकांची कामे होणार आहेत. यामुळे योजनेची सिंचन कार्यक्षमता वाढणार आहे. केंद्र शासनाच्या लाभक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर असलेली २८३ कोटी ११ लाख रुपयांच्या निधीतून ही कामे डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान राज्य सरकारपुढे आहे. सध्या लाभक्षेत्र विकासाची ही कामे सुरू झाली आहेत.ताकारी योजनेतील वितरिकांची लांबी २०७.१९ किमी आहे, तर लघु वितरिकांची लांबी १३६.५६ किमी आहे. एकूण ३४३.७५ किमी लांबीच्या वितरिका व लघु वितरीकांद्वारे लाभक्षेत्राला पाणी दिले जाते. परंतु, अपूर्ण व नादुरुस्त वितरीकांमुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या बांधावर थेट पाणी पोहोचत नाही. यामुळे सिंचनाची कार्यक्षमता कमकुवत झाली आहे.
बंदिस्त नलिकेमध्ये रुपांतरणाची कारणे ताकारी योजनेचे मुख्य आणि शाखा कालवे अस्तरीत आहेत, परंतु त्यावरील वितरण व्यवस्थाविना अस्तरीत आहे. ही वितरण व्यवस्था १२ ते १५ वर्षांपूर्वी पारंपरिक पद्धतीने पूर्ण झाली होती, मात्र त्यानंतर मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. झाडे-झुडपे उगवली आहेत. यामुळे वितरण प्रणाली कार्यक्षम नाही. पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे आणि पाणी शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. यावर उपाय म्हणून बंदिस्त नलिकेचे रुपांतरण अत्यंत आवश्यक आहे.
भूसंपादन खर्चाची बचत वितरीकांचे भूसंपादन अजूनही पूर्ण झालेले नाही. बंदिस्त नलिका रुपांतरणामुळे भूसंपादनाची आवश्यकता राहणार नाही. यामुळे भूसंपादन खर्चात मोठी बचत होईल आणि बचत झालेल्या खर्चातच बंदिस्त नलिकांचे काम होईल.
बंदिस्त नलिकेमध्ये रुपांतरणाचे फायदे
- शेतकऱ्यांना थेट बांधावर चेंबरद्वारे मिळणार पाणी.
- प्रत्येक वितरीकाच्या शेवटच्या भागातील शेतकऱ्यांनाही सिंचनाचा लाभ मिळेल.
- बंदिस्त नलिकांमुळे बाष्पीभवन कमी होईल, पाण्याचा अपव्यय कमी होईल.
- पाणी चोरीला आळा बसेल, वितरण सुलभ होईल.
- पाणीपट्टी वसूली प्रभावी होईल.
- देखभाल व दुरुस्तीचा खर्च कमी होईल.
- योजनेचा वीज खर्च कमी होईल.
- जमिनीचे क्षारपण टळेल आणि पोत सुधारेल.
शेतकऱ्यांच्या शंका निरसनाची आवश्यकता बंदिस्त पाइपलाइनमुळे पाण्याचा पाझर कमी होईल आणि जमिनीतील व विहिरींची पाणी पातळी खालावेल, अशी शेतकऱ्यांना भीती आहे. यावर प्रशासन, शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक होऊन शेतकऱ्यांच्या शंका निरसन होणे गरजेचे आहे, अशी सूचना आमदार विश्वजित कदम यांनी नागपूर अधिवेशनात मांडली आहे. मात्र, यावर कार्यवाही होणे अत्यंत आवश्यक आहे.
रस्ते बंद होण्याची भीतीसद्य:स्थितीत वितरीकांच्या बाजूने अनेक ठिकाणी रस्ते आहेत.आता बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमुळे रस्ते बंद करून संबंधित शेतमालक त्या जागी शेतीपिके घेतील. यामुळे रस्ते बंद होतील, अशी भीती आहे.