दिलीप मोहितेविटा : शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत महावितरणच्या विटा उपविभागात सुमारे ३६० एकर शासकीय गायरान जमिनीवर सोलार ऊर्जा प्रकल्प उभारणीस सुरूवात झाली आहे.विटा उपविभागातील खानापूर, आटपाडी व कडेगाव तालुक्यात १३ ठिकाणी जवळपास ७२ मेगावॅटसाठी काम सुरू आहे. त्यातून प्रतिदिन १७ लाख २८ हजार युनिट वीज निर्मिती अपेक्षित आहे.खानापूर, आटपाडी व कडेगाव तालुक्यात सध्या टेंभू, ताकारी तसेच आरफळ आदी जलसिंचन योजनांचे पाणी शिवारात फिरले आहे. महावितरण सात ते आठ तासच कृषिपंपांना वीज देत असल्याने पिके धोक्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा वीज मिळावी, यासाठी शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे.महावितरणच्या विटा उपविभागातील खानापूर तालुक्यात बेणापूर, रेणावी, भाग्यनगर यासह सहा ठिकाणी प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. त्यातून उत्पादित होणारी वीज महावितरणच्या खानापूर, गार्डी, रेणावी, पारे येथील उपकेंद्राला जोडली जाणार आहे. तर आटपाडी तालुक्यातील घाणंद, पळसखेल, लिंगीवरे तसेच माडगुळे याठिकाणच्या प्रकल्पात तयार होणारी वीज खरसुंडी, लिंगीवरे, पुजारवाडी, माडगुळे या उपकेंद्राला जोडण्यात येणार आहे. या दोन तालुक्यात सुमारे ५९ मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे.कडेगाव तालुक्यातील शिरसगाव व तडसर या दोन ठिकाणी सोलर प्रकल्प प्रस्तावित आहे. या दोन ठिकाणी १३ मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. त्यामुळे महावितरणच्या विटा उपविभागात सध्या सोलार प्रकल्पातून सुमारे ७२ मेगावॅट वीज निर्मिती प्रस्तावित असून त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे प्रकल्प नव्या वर्षात पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे.
सोलर प्रकल्प दृष्टीक्षेपात
- सोलार प्रकल्पाच्या एक मेगावॅटसाठी ५ एकर जमिनीची आवश्यकता.
- खानापूर, आटपाडी व कडेगाव तालुक्यात प्रकल्पाची उभारणी सुरू.
- ७२ मेगावॅटच्या सोलार प्रकल्पासाठी ३६० एकर जमीन अधिग्रहण.
- प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर प्रतिदिन १७ लाख २८ हजार युनिट वीज निर्मिती.
- सरासरी ५ अश्वशक्तीचे १० हजार कृषिपंपांना एकावेळी वीजपुरवठा शक्य.
शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून विटा उपविभागात विविध ठिकाणी ७२ मेगावॅट इतका सोलार ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम हाती घेतले आहे. शासकीय गायरान जमिनी यासाठी घेतल्या आहेत. लवकरच हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यास अडचण येणार नाही. - विनायक इदाते, कार्यकारी अभियंता, महावितरण, विटा उपविभाग.