शिराळा (जि. सांगली) : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जंगलात मचाणावर बसून निसर्गप्रेमींनी अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर रात्रीचं अद्भुत जंगल अनुभवलं. निसर्गानुभव २०२५ अर्थात प्राणिगणनेच्या निमित्ताने हे दर्शन घडले. ६० मचाणांवर १२० प्रगणकांनी ही गणना केली. या निसर्गप्रेमींना अरण्यवाचनाचा थरारक अनुभव घेण्याची संधी मिळाली. गव्यांची संख्या तब्बल ३२९ असून एका वाघाची डरकाळीसुद्धा घुमत आहे.घनदाट जंगल. पाणवठ्यावर उभारण्यात आलेल्या मचाण. आजूबाजूच्या दाट झाडीतून रातकिड्यांची ऐकू येणारी किरकिर. अंगाला झोंबणारा गार वारा, उंच मचाणावरून दिसणारं विस्तीर्ण जंगल. समोर पाणवठा, तहान भागवण्यासाठी अधूनमधून रात्रभर येणारे वेगवेगळे प्राणी मनात तितकीच भीती आणि उत्सुकता होती.या प्रकल्पात दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्या रात्रीत व्याघ्रगणनेचे आयोजन केले जाते. यापूर्वी कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून वन्यजीवांची गणना केली जात होती. मात्र सामान्य लोकांना वने व वन्यजीव यांच्याबाबत माहिती मिळावी, या उद्देशाने हा निसर्ग अनुभव कार्यक्रम राबवला. यावर्षी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कोयना विभागात कोयना, पाटण, बामनोली, कांदट, तर चांदोली विभागात येणाऱ्या चांदोली, हेळवाक, ढेबेवाडी, आंबा आदी ठिकाणी रात्री ८ ते १० या वेळेत प्रत्यक्ष मचाणावर हे निसर्गप्रेमी पोहोचले.आठ वन परिक्षेत्रात ६० मचाण उभारले होते. या प्रत्येक मचाणावर प्रत्येकी दोन प्रगणक असे १२० प्रगणकांनी ही गणना केली. रात्रभर मचाणावर बसून या निसर्गप्रेमींनी पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांची नोंद केली. गणनेसाठी नेमलेल्या प्रगणकांच्या निरीक्षणातून आलेल्या नोंदी एकत्रित करून अहवाल तयार करण्यात येत आहे.
वन्यप्राण्यांचे प्रत्यक्ष दर्शननिसर्गप्रेमींना गणनेदरम्यान चितळ, गवे, मोर, खवलेमांजर, सांबर, भेकर, ससा, डुक्कर, शेखरू, विविध रंगांची फुलपाखरे, वानरे, माकडे, विविध वनस्पती पाहायला मिळाल्या. बिबट्याची विष्ठा, पायाचे ठसेही आढळून आले. काही ठिकाणी अस्वलाचा आवाज ऐकायला मिळाला.चांदोली वन्यप्राण्यांची गणनावाघ- (१ डरकाळी), बिबट्या - ४ व (१ डरकाळी), रानकुत्रा - ५, कोल्हा- १, अस्वल -११, उदमांजर -९, मुंगुस प्रजाती- १०, साळींदर -११, खवलेमांजर- १, गवा - ३२९, सांबर -२८, रानडुक्कर -१०६, भेकर-१६, वानर-५, माकड- २६, ससा- ९, शेकरू-१६, खार-२, रानउंदीर- ३, वटवाघूळ- ६, मोर-१५, राणकोंबडा -१४०, चकोत्री -३