विटा : देवीखिंडी (ता. खानापूर) येथील ग्रामपंचायतीने पतीच्या मालमत्तेत पत्नीचाही हक्क सांगणारा निर्णय घेतला आहे. गावठाणातील मालमत्ता पतीपत्नीच्या संयुक्त नावे नोंदविल्या आहेत. असा धाडसी निर्णय सर्वानुमते घेऊन पत्नीलाही ८ अ च्या उताऱ्यावर आणणारी देविखिंडी ही सांगली जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.सरपंच रुक्मिणी निकम, उपसरपंच प्रकाश निकम, ग्रामसेवक सोमनाथ सपाटे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी मासिक सभेत हा ठराव मंजूर केला. त्यानंतर ग्रामसभेतही ग्रामस्थांनी त्याला एकमुखी मंजुरी दिली. ठरावावर हरकतीही मागविल्या, परंतु ग्रामस्थांनी संपूर्ण पाठिंबा दिला. गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील यांच्याहस्ते ग्रामपंचायत मिळकतीचे ८ अ उतारे पतीपत्नीला देण्यात आले.देविखिंडी हे खानापूर तालुक्यातील डोंगरी गाव असून लोकसंख्या २२१२ आहे. यात महिलांची संख्या ११६९ आहे. म्हणजेच लोकसंख्येच्या ५३ टक्के महिला आहेत. ग्रामपंचायतीकडे एकूण १२१४ मिळकती नोंद आहेत. त्यापैकी ९०६ मालमत्ता पतीपत्नीच्या नावावर करण्यात आल्या.
Sangli: देविखिंडीत गावठाण मिळकती झाल्या पतीपत्नीच्या नावावर, जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम
By संतोष भिसे | Updated: March 26, 2024 16:44 IST