सांगलीतील वसंतदादा बँकेची देखणी इमारत काळाच्या पडद्याआड, आर्थिक घोटाळ्यांमुळे वाताहत

By अविनाश कोळी | Published: March 11, 2024 06:45 PM2024-03-11T18:45:23+5:302024-03-11T18:47:45+5:30

सांगली : सहकारी बँकांच्या इतिहासात सर्वात सुंदर वास्तू म्हणून सांगलीच्या वसंतदादा सहकारी बँकेच्या इमारतीची ओळख होती. बँकेची ही देखणी ...

The building of Vasantdada Bank in Sangli is behind the curtain of time, weathered by financial scams | सांगलीतील वसंतदादा बँकेची देखणी इमारत काळाच्या पडद्याआड, आर्थिक घोटाळ्यांमुळे वाताहत

सांगलीतील वसंतदादा बँकेची देखणी इमारत काळाच्या पडद्याआड, आर्थिक घोटाळ्यांमुळे वाताहत

सांगली : सहकारी बँकांच्या इतिहासात सर्वात सुंदर वास्तू म्हणून सांगलीच्या वसंतदादा सहकारी बँकेच्या इमारतीची ओळख होती. बँकेची ही देखणी इमारत आता काळाच्या पडद्याआड जात आहे. इमारतीची खरेदी केलेल्या कंपनीने येथे मोठे बांधकाम सुरू केले असून जुनी इमारत दृष्टीआड गेली आहे.

वसंतदादा बँकेची मुख्य इमारत डेक्कन इन्फ्रा कंपनीने १० कोटी ७३ लाखांना लिलावात खरेदी केली आहे. खरेदीनंतर बँकेचा फलक हटवून कंपनीचा फलक लावण्यात आला होता. काही दिवस ही इमारत आहे तशीच उभी होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कंपनीने दर्शनी भागात बांधकाम सुरू केले असून हळूहळू जुनी इमारत दृष्टीआड जात आहे. काळाच्या पडद्याआड जाणारी ही इमारत पाहून सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या मनाला वेदना होत आहेत.

बँकेचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत मदन पाटील यांच्या प्रयत्नातून सांगली-मिरज रस्त्यावर भव्य, सुसज्ज व अत्याधुनिक अशी चार मजली इमारत बांधण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते २००१ मध्ये या इमारतीचे उद्घाटन झाले होते. कालांतराने आर्थिक घोटाळ्यांमुळे ही बँक अडचणीत आली. त्यानंतर बँक अवसायनात काढण्यात आली.

२०१९ मध्ये तत्कालीन अवसायक निळकंठ करे यांनी ही इमारत विकण्याबाबतची परवानगी सहकार विभागाकडून मागितली होती. त्यानंतर त्यांनी लिलाव प्रक्रिया राबवून डेक्कन इन्फ्रा कंपनीला १० कोटी ७३ लाखाला ही इमारत विक्रीबाबतचा प्रस्ताव कायम केला. या लिलाव प्रक्रियेविरुद्ध ठेवीदार संघटना, अन्याय निर्मूलन समिती व अन्य संघटनांनी तत्कालीन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. पाटील यांनी या लिलाव प्रक्रियेला स्थगिती दिली होती. २०२३मध्ये स्थगिती उठविण्यात आली व लिलाव कायम करण्यात आला. आता कंपनीने बँकेच्या इमारतीचा ताबा घेऊन त्याठिकाणी बांधकामास सुरुवात केली आहे.

आर्थिक घोटाळ्यांमुळे बँक रसातळाला

कधी काळी आर्थिकदृष्ट्या सक्षम व कार्यविस्तार मोठा असलेली ही बँक आर्थिक घोटाळ्यांमुळे रसातळाला पोहोचली. इमारतीची मुख्य इमारतही आता काळाच्या पडद्याआड जाताना दिसत आहे.

Web Title: The building of Vasantdada Bank in Sangli is behind the curtain of time, weathered by financial scams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.