मोहन मोहिते वांगी : रामापूर (ता . कडेगाव) येथे महापुरुषांचा पुतळा हटवल्यावरून वातावरण तणावपुर्ण बनले आहे. ग्रामस्थानी संपुर्ण गाव बंद करुन ग्रामंपचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत प्रशासनाने नेलेला पुतळा आणून बसवत नाही, तोपर्यंत येथून उठणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.रामापुर येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर गावातील युवकांनी शुक्रवारी पहाटे विनापरवाना महापुरुषांचा पुतळा बसवला होता. विनापरवाना पुतळा बसवल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने हा पुतळा हटवण्याचा तात्काळ निर्णय घेतला. त्यामुळे कडेगावचे प्रांताअधिकारी रंजीत भोसले, तहसीलदार अजित शेलार, उपविभागीय अधिकारी सचिन थोरबोले, राहुल घुगे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा व राखीव दलाची तुकडी घेऊन बसवलेला पुतळा प्रशासनाने ताब्यात घेतला.पुतळा हटवल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत. गावातील महिला,तरुण मोठया संख्येने गावातील चौकात जमले. व त्यानी संपूर्ण गावातून फेरी काढून गांव बंद करुन ग्रामपंचायत कार्यालया समोर ठिय्या आदोलन सुरु केले. दुपारी पोलीस व आंदोलकांची बैठक सुरू होती.पुतळा हटवताना पोलिस-तरुणांमध्ये झटापटप्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या उपस्थितीत पुतळा हटवण्याचे काम पोलिसांनी सुरू करताच तरुण चांगलेच आक्रमक झाले. यांना बाजूला करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचा वापर करावा लागला.
Sangli: महापुरुषांचा पुतळा हटवल्यामुळे रामपुरात तणाव, ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन; पोलिसांचा मोठा बंदोबस्त
By हणमंत पाटील | Updated: January 31, 2025 15:18 IST