दिघंची : आमदार अनिल बाबर व शिवसेनेचे नेते तानाजीराव पाटील यांच्या अथक प्रयत्नांना यश आले आहे. टेंभू योजनेचे पाणी दिघंची (ता. आटपाडी) येथील निंबाळकर तलावात लवकरच दाखल होणार आहे, अशी माहिती दिघंचीचे सरपंच अमोल मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, कुरुंदवाडी, झरे येथून दिघंचीपर्यंत अनेक अडचणींवर मात करत सुमारे २५ किलोमीटर बंदिस्त पाईपलाईन दिघंचीच्या तलावापर्यंत केली आहे. टेंभूचे पाणी निंबाळकर तलावात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. २०१९ मध्ये ११ किलोमीटर पाइपलाइन पूर्ण झाली होती.
शेनवडी येथील ओढापात्रात पाणी सोडण्यात आले होते. तेथून पुढे १६ किलोमीटर अंतर ओढा पात्रातून पाणी अनेक बंधारे भरून प्रवास करत निंबाळकर तलावात दाखल होत होते. त्यावेळी पाण्यासाठी अहोरात्र पहारा द्यावा लागत होता. लॉगडाऊनचा काळ असल्याने पाइप उत्पादन बंद होते. त्यामुळे पाइप मिळत नव्हत्या. उर्वरित राहिलेले पाइप लोंडिंग व खुदाईचे काम पूर्ण झाले असून वळण असणाऱ्या ठिकाणी जोडणी राहिली आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याची चाचणी घेण्यात येणार आहे. बंदिस्त पाइपलाइनचे काम पूर्ण करण्यासाठी व पाणी निंबाळकर तलावात आणण्यासाठी आमदार अनिल बाबर व तानाजी पाटील यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला व प्रयत्नांना यश आले आहे. लवकरच निंबाळकर तलावात टेंभू योजनेचे पाणी दाखल होणार आहे.
यावेळी तेजश्री मोरे, ग्रा प सदस्य बाळासाहेब होनराव, सागर ढोले, विकास मोरे, राहुल पांढरे, मुन्ना तांबोळी, नानासो जावीर आदी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.