सांगली : शक्तिपीठ महामार्ग विरोधातील आंदोलनात सहभागी कोल्हापूर महापालिकेचे शिक्षक गिरीश फोंडे यांचे निलंबन रद्द करण्यासंदर्भात कोल्हापूर महापालिका आयुक्तांना पत्र देऊ. तसेच शक्तिपीठ महामार्ग बाबत चर्चा सुरू असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले.गिरीश फोंडे यांचे निलंबन रद्द करा, शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, अन्यथा पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवू, असा इशारा शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समिती तर्फे दिला होता. त्याची दखल घेत पोलिस अधीक्षक संदीप घुगे, निरीक्षक सुधीर भालेराव यांनी मध्यस्थी करत पालकमंत्री पाटील यांच्यासमवेत कृती समितीचे उमेश देशमुख, महेश खराडे, उमेश एडके, विष्णू पाटील यांच्याशी पोलिस मुख्यालयात चर्चा केली.पालकमंत्री पाटील म्हणाले, गिरीश फोंडे हे कोल्हापूर महापालिकेत शिक्षक आहेत. शक्तिपीठ महामार्ग विरोधी आंदोलनात सहभाग घेतल्याबद्दल त्यांना निलंबन करण्यात आले आहे. या संदर्भात कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तांना पत्र देऊन निलंबन रद्द करण्याबाबत शिफारस करणार आहे, असे आश्वासन सांगलीतील शेतकऱ्यांना दिले. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, महापालिका आयुक्त रविकांत आडसूळ उपस्थित होते.
बेदाण्याचा पोषण आहारात वाटपासाठी प्रयत्न करु : पाटीलबेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश बाबत शासन निर्णय होऊन देखील त्याचा समावेश झालेला नाही. त्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही, ही बाब उमेश देशमुख यांच्यासह शेतकऱ्यांनी पालकमंत्री पाटील यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर यात लक्ष घालून बेदाण्याचा शालेय पोषण आहारात वाटपाबाबत संबंधितांना सूचना देण्यात येतील, असे आश्वासन शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले.