लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : तडीपार असतानाही कुपवाड शहरात फिरणाऱ्या संशयितास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. सूरज रमेश काळे (वय २३, रा. रेणुका मंदिराजवळ, कुपवाड) असे त्याचे नाव असून, त्याला कुपवाड एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कडक कारवाईचे निर्देश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम व अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक बुधवारी कुपवाड परिसरात गस्तीवर होते. यावेळी सूरज काळे दोन जिल्ह्यांतून तडीपार केलेला आरोपी कुपवाड येथील यल्लमा मंदिराजवळ थांबल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक अभिजित सावंत व कर्मचाऱ्यांनी त्यास ताब्यात घेतले. कोणतीही परवानगी न घेता तो आल्याने त्यास पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुधीर गोरे, महादेव नागणे, शशिकांत जाधव, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.