सांगली : एक रात्र अन्नदात्यांसाठी जागवूया म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी रात्री स्टेशन चौकात रात्र जागविली. आत्मक्लेश आंदोलन केले. दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून किसान संघर्ष समितीतर्फे किसान जागर आंदोलन केले. केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजीने शेतकऱ्यांनी चौक दणाणून सोडला.
संध्याकाळी सातपासूनच मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होऊ लागले होते. सोबत अंथरूण, पांघरूण, रात्रीचे जेवण अशी जय्यत तयारी होती. रात्रीच्या थंडीला तोंड देण्यासाठी शेकोटीचीही तयारी होती. ऐन शहरात मुक्कामासाठी गर्दी केलेले शेतकरी पाहून शहरवासीयदेखील थबकून पाहत राहिले. सुरुवातीला मोजक्याच शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सुरू झालेला जागर नंतर जोर धरत गेला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी जागराची पार्श्वभूमी सांगितली. दिल्लीतील आंदोलनाची माहिती देत नव्या कृषी कायद्यांचा निषेध केला. ज्योती अदाटे यांनी तालबद्ध घोषणा देत आंदोलनात जान आणली. थंडीपासून संरक्षणासाठी पेटविलेल्या शेकोटीभोवती रात्रीचे जेवणही केले. रात्र पुढे सरकेल तसा भजनाने रंग धरला.
आंदोलनात खराडे यांच्यासह संदीप राजोबा, डॉ. संजय पाटील, लालू मेस्त्री, संजय बेले, उमेश देशमुख, दिग्विजय सूर्यवंशी, आदिनाथ मगदूम, संजय बनसोडे आदी सहभागी झाले. काँग्रेस नेते जितेश कदम यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला.