तासगाव : मानवाच्या शाश्वत विकासासाठी पृथ्वीवरील प्रत्येक वनस्पती, बुरशीजन्य वनस्पती, हिंस्र प्राणी, कीटक, सरपटणारे जीव, पक्षी, उभयचर प्राणी असे सर्व प्रकारचे जीव महत्त्वाचे आहेत. या सर्व जैवविविधतेचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. रवीकुमार यांनी केले.
येथील पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात जागतिक जैवविविधता दिनानिमित्त वेबिनार झाला. ते म्हणाले की, जैवविविधतेमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो.
प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी जैवविविधतेच्या ऱ्हासाची कारणे व त्यांचे दुष्परिणाम सांगितले. संयुक्त राष्ट्रसंघाने स्थापित केलेल्या व २०३० पर्यंत साध्य करण्याचे उद्दिष्ट असलेल्या शाश्वत विकासाच्या ध्येयामध्ये जैवविविधतेचे महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.
वेबिनारमध्ये महाराष्ट्र व कर्नाटकातील विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक सहभागी झाले होते. डॉ. अलका इनामदार, डॉ. जीवन घोडके, डॉ. सचिन शिंदे, प्रा.अण्णासाहेब बागल यांनी संयोजन केले.