सांगली : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या गळ्यावर सुरीने हल्ला केला. न्यायालयाच्या आवारात आज (शनिवार) दुपारी ही घटना घडली. अंजली दत्ता लवटे (वय २४, रा. वाघमोडेनगर, कुपवाड) असे पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी दत्ता जगन्नाथ लवटे (३०) याच्याविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा त्याला ताब्यात घेण्यात आले.हल्ल्यात जखमी झालेल्या अंजली लवटे यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. लवटे पती-पत्नीचा २००९ मध्ये नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे विवाह झाला आहे. दत्ताला दारूचे व्यसन आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो अंजलीच्या चारित्र्यावर संशयित घेऊन तिला मारहाण करीत आहे. त्याच्या दररोजच्या त्रासाला कंटाळून ती सध्या माहेरी रहात आहे. महिन्यापूर्वी दोघांनी घटस्फोट घेऊन विभक्त राहण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी दोघेही आज (शनिवार) न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी आले होते.दत्ता हा सकाळी अकरा वाजता आला होता. अंजली बारा वाजता न्यायालयाच्या आवारात आली. त्यावेळी त्याने तिला गाठून एवढा का वेळ? अशी विचारणा केली. यातून त्यांच्यात जोरदार वाद झाला. दत्ताने तिला शिवीगाळ केली. खिशातील चाकू काढून तिच्या गळ्यावर वार केला. यामध्ये ती रक्तबंबाळ झाली. अनपेक्षित घडलेल्या या घटनेने तणाव निर्माण झाला होता. नागरिकांनी गर्दी करताच दत्ताने तेथून पलायन केले. त्यानंतर जखमी अंजली उपचारासाठी हलविण्यात आले. शहर पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री उशिरा पती दत्ता लवटे याला ताब्यात घेतले आहे. (प्रतिनिधी)
सांगलीत पत्नीवर सुरीने खुनीहल्ला
By admin | Updated: September 21, 2014 00:44 IST