Suresh Khade welcome! | सुरेश खाडे यांचे जल्लोषी स्वागत!
सुरेश खाडे यांचे जल्लोषी स्वागत!

मिरज : सामाजिक न्यायमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांचे रविवारी मिरजेत जल्लोषी स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी व वाद्यांच्या तालावर रंगलेल्या मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. भर पावसात मिरवणूक काढण्यात आली होती.
मिरजेत सांयकाळी ७ वाजता खाडे यांचे आगमन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून खाडे यांचा ताफा महात्मा गांधी चौकात आला. गांधी चौकातून वाद्यांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणुकीस सुरुवात झाली.
मिरवणूक मार्गावर विविध पक्ष संघटनांतर्फे स्वागत व अभिनंदनाचे फलक लावण्यात आले होते. मिरवणूक सुरु असताना पावसाने हजेरी लावली. मिरवणुकीत हिंदी चित्रपटगीतांच्या तालावर पावसातही कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु होते. शिवाजी पुतळा, गणेश तलाव, शनिवार पेठ, श्रीकांत चौक, किसान चौक, येथे खाडे यांचे मिरवणूक मार्गावर विविध ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. सजविलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून खाडे यांची तीन तास मिरवणूक सुरु होती. खाडे यांच्या पत्नी सुमन खाडे व कुटुंबीय मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरजेतील खाडे यांच्या कार्यालयाजवळ मिरवणुकीचा समारोप झाला.
महापौर संगीता खोत, नगरसेविका अनिता व्हनखंडे, मोहन व्हनखंडे, शिवाजी दुर्वे, पांडुरंग कोरे, संदीप आवटी, निरंजन आवटी, ओकार शुक्ल, दिगंबर जाधव, सुरेश आवटी, तानाजी घारगे, सचिन चौगुले, राजा देसाई, शीतल पाटोळे, नगरसेवक गणेश माळी, आनंदा देवमाने, गजेंद्र कुल्लोळी, गायत्री कुळ्ळोळी, के. के. काझी, असगर शरीकमसलत सहभागी झाले होते. खाडे यांच्या कार्यालयासमोर मिरजकर नागरिकांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. मिरजकर नागरिकांचे प्रेम व आशीर्वाद यामुळे माझी मंत्रीपदी निवड झाली आहे. या पदाचा उपयोग गरिबांच्या सेवेसाठी, तसेच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी करेन, अशी ग्वाही खाडे यांनी यावेळी दिली.

आईकडून झालेल्या कौतुकाने भारावले खाडे
सांगलीवाडी टोलनाक्याजवळ रविवारी भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी गर्दी केली होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचे येथे आगमन झाले. त्यावेळी त्यांच्या आई तानुबाई यांनी मुलास आलिंगन देत कौतुक केले, तेव्हा खाडे यांच्यासह कार्यकर्तेही भावूक झाले होते. त्यानंतर खाडे यांचे टिळक चौकात स्वागत करण्यात आले. गणपती मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर टिळक स्मारक मंदिरात त्यांचे कार्यकर्त्यांच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, माजी आमदार दिनकर पाटील, शेखर इनामदार, प्रकाशतात्या बिरजे, बजरंग पाटील, महापालिकेचे सभागृह नेते युवराज बावडेकर आदी उपस्थित होते. त्यानंतर मिरवणुकीने ते महापालिकेजवळ आल्यानंतर काही नगरसेवकांनी त्यांचे स्वागत केले.

पाचशे किलोचा हार
मिरजेतील शिवाजी चौकात सुरेश आवटी युवा मंचतर्फे खाडे यांना क्रेनच्या साहाय्याने भलामोठा फुलांचा हार घालण्यात आला. हा हार तयार करण्यासाठी सुमारे पाचशे किलो फुलांचा वापर करण्यात आला होता. हा फुलांचा हार मिरवणुकीत लक्षवेधी ठरला. कार्यकर्त्यांनी यावेळी टाळ््यांचा कडकडाट केला. तब्बल ५० वर्षांनंतर मिरजेला मंत्रीपद मिळाल्याने गेले आठवडाभर भाजप कार्यकर्त्यांकडून खाडे यांच्या स्वागताची तयारी सुरु होती.


Web Title: Suresh Khade welcome!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.