सांगली : देशातील कोरोना स्थिती हाताळण्यासाठी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे नेतृत्व द्यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केली होती. त्या मागणीला भाजपच्या राज्य कार्यकारिणी सदस्या नीता केळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून पाठिंबा दर्शविला आहे.
पक्षाच्या वेबपेजबरोबर नीता केळकर यांनी ट्विट करतानाच सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, प्रवक्ते केशव उपाध्ये, अतुल भातखळकर यांच्यासह राज्यातील अनेक भाजप नेत्यांनाही टॅग केले आहे. केळकर यांनी म्हटले आहे की, कोविडचा सामना करण्यासाठी आरोग्यसेवेशी निगडित सर्व सूत्रे नितीन गडकरी यांच्याकडे द्यावीत, या सुब्रमण्यम स्वामींच्या वक्तव्याशी मी सहमत आहे. आपण आहात का? कमेंट करा, शेअर करा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
केळकर यांनी सांगितले की, कोरोनाची ही आपत्ती मोठी आहे. गडकरी अत्यंत अनुभवी नेते आहेत. त्यांनी आजवर विविध खात्यांचे नेतृत्व सक्षमपणे केले आहे. त्यांच्या या अनुभवाचा देशाला फायदा होऊ शकतो. ते कोरोनाची परिस्थिती सक्षमपणे हाताळू शकतात.