आटपाडी : वाढदिवसादिवशी डामडौल न करता जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची थेट आर्थिक मदत देऊन आधार देण्याचा प्रयत्न करणार आहे. जिल्ह्यातील २०१३, २०१४ आणि २०१५ मधील आतापर्यंतच्या अशा २१ शेतकऱ्यांच्या घरी जाऊन आर्थिक मदत देणार आहे, अशी माहिती भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिली.पडळकर म्हणाले की, दुष्काळ, गारपीट, नापिकी यासह विविध कारणांनी शेतकरी हतबल होऊन आत्महत्या करीत आहेत. घरातला कर्ता माणूस गेल्यावर त्या घराची वाताहत होते. कुटुंबाचा आधार कोसळल्याने कुटुंब कोलमडून जाते. जिल्ह्यातील अशा कुटुंबियांची जेव्हा आम्ही माहिती घेतली, तेव्हा धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली. जिल्ह्याच्या पूर्वभागातील आटपाडी, जत या सदैव दुष्काळी भागातीलच नव्हे, तर कृष्णाकाठावरील काही शेतकऱ्यांनीही मृत्यूस कवटाळले आहे. असे होऊ नये, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होण्याची गरज आहे. ज्या शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली, त्यांच्या कुटुंबियांना समाजाने आधार देण्याची गरज आहे. या जाणिवेतून यंदाचा वाढदिवस थाटात साजरा करण्याऐवजी जिल्ह्यातील तानाजी जमदाडे (मणेराजुरी, ता. तासगाव), जयवंत पाटील (कांदे, ता. शिराळा), आनंदा शिंदे (रेवनाळ, ता. जत), भीमराव नलवडे (बोर्गी, ता. जत), विजयकुमार बरडेल (बोर्गी, ता. जत), अण्णासाहेब बिराजदार (बिजर्गी, ता. जत), भीमराव गायकवाड (शेटफळे, ता. आटपाडी), राजाराम डोळे (माधळगाव, ता. शिराळा), आनंदा शिंदे (फाळकेवाडी, ता. वाळवा), गैबासा मुल्ला (बालगाव, ता. जत), दत्तात्रय यादव (वज्रचौंडे, ता. तासगाव), प्रकाश घोरपडे (पलूस, ता. पलूस), शिवाजी झुरे (ढालगाव, ता. कवठेमहांकाळ), विजय नलवडे (कवलापूर, ता. मिरज), नामदेव डाळे (पलूस, ता. पलूस), अशोक साळुंखे (दहीवडी, ता. तासगाव), प्रकाश जाधव (बनेवाडी, ता. कवठेमहांकाळ), विलास गायकवाड (शेटफळे, ता. आटपाडी), मधुकर घेरडे (काशिलिंगवाडी, ता. जत), बजरंग झांबरे (डोंगरसोनी, ता. तासगाव), धोंडीराम इसापुरे (मिरज) या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करणार आहे. (वार्ताहर)एक हात मदतीचाजगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी. त्याच्याकडे दुर्लक्ष करणे सरकारसह कोणालाच परवडणारे नाही. आयुष्यभर शेतीत काबाडकष्ट करुन जगाचे पोट भरणाऱ्या शेतकऱ्यांना समाजातील सर्व तरुणांनी मदत करावी, असे आवाहन पडळकर यांनी केले.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत
By admin | Updated: October 1, 2015 00:43 IST