सांगली : ऊसतोडणी मुकादम व मजुरांकडून ऊसतोडणी वाहतूकदारांची गेल्या तीन वर्षांत १ हजार ५०० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी संबंधित मुकादम यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून वाहतूकदारांचे पैसे वसूल करून द्यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. या मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हा पोलिसप्रमुख संदीप घुगे यांच्याकडे दिले आहे. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा पोलिसप्रमुख घुगे यांना निवेदन दिले.यावेळी शेट्टी म्हणाले की, गेल्या तीन वर्षांमध्ये जवळपास १ हजार ५०० कोटी रुपयांची फसवणूक ऊसतोडणी मुकादम व मजुरांनी वाहतूकदारांची केली आहे. मागील दोन वर्षांमध्ये गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. पोलिस स्टेशनमध्ये ऊस वाहतूकदार गुन्हा नोंदवण्यात गेल्यानंतर त्याला वेगवेगळी कारणे सांगून गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ केली जाते.
ऊसतोडणी मुकादम व मजूर हे प्रामुख्याने बीड, लातूर, उस्मानाबाद, धुळे, नंदुरबार, जालना, सोलापूर जिल्हा व जत तालुक्यातील काही प्रमाणात आहेत. ऊस वाहतूकदाराने मुकादम व मजुरांच्या भागामध्ये जाऊन दिलेल्या पैशांची मागणी केल्यानंतर महिलांना पुढे करून विनयभंग, खंडणीचे गुन्हे दाखल केले जात आहेत.मुकादम आणि मजुरांच्या फसवणुकीमुळे ऊस वाहतूकदार कर्जबाजारी झाले आहेत. ऊसतोडणी वाहतूकदार शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील केलेले आहेत. मुकादमांकडून खुनाचे प्रयत्न देखील झालेले आहेत. साखर कारखानदार जबरदस्तीने वाहने जप्त करीत आहेत. या कारखानदारांवर ही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याकडे केली आहे.फसवणूकप्रकरणी गुन्हे दाखल करुन अटक करणार : संदीप घुगेऊसतोडणी वाहतूकदारांची फसवणूक करणाऱ्या मुकादम आणि मजुरांवर गुन्हा दाखल करून घेतले जातील. यासंबंधी संबंधित पोलिस स्टेशनला तत्काळ आदेश देण्यात येतील. तसेच फसवणुकीतील आरोपींना तत्काळ अटक करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा पोलिस प्रमुख संदीप घुगे यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना दिले.