इस्लामपूर : साखराळे (ता. वाळवा) येथील शेतकऱ्याला ऊस तोडणीसाठी मजूर आणि ट्रॅक्टरचालक पुरविण्याचे आमिष दाखवीत त्यांची १३ लाख १० हजारांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. हा प्रकार मार्च ते ऑगस्ट २०११ या कालावधीत राजारामनगर येथे घडला.
याबाबत भालचंद्र श्यामराव देसाई (वय ६८, रा. साखराळे) यांनी आज पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार भेरू भाऊराव पाटील (रा. मडसनाळ, जि. विजापूर), सुखदेव कृष्ण चौगुले (रा. जालिहाळ बुद्रुक, ता. जत), बाळू कृष्णा लेंगरे (रा. मोटेवाडी-कोंत्येवबोबलाद, ता. जत) या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या तिघांनी देसाई यांना ऊस तोडणीसाठी मजूर आणि ट्रॅक्टरचालक पुरवितो, असे सांगून वेळोवेळी पैसे उकळले. तरीदेखील तिघांनी देसाई यांना हे मजूर व ट्रॅक्टरचालक पुरविले नाहीत. देसाई यांनी पैशाची मागणी केल्यावर तेदेखील परत दिले नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच देसाई यांनी पोलिसात धाव घेतली.