सांगली : एसटी बसमध्ये फुकटचा प्रवास कुणी करू नये, यासाठी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील १३२ मार्गांवरील एक हजार ३६ बसची २५ पथकांनी अचानक तपासणी केली. या तपासणीमध्ये एकाही वाहकाकडून गैरकारभार झालेेला नसल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे कुणावरही दंडात्मक कारवाई झाली नसल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पाटबंधारे विभागातील बागेची अनेकांना भुरळ
सांगली : सांगली पाटबंधारे मंडळाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता हनुमंत गुणाले यांच्या पुढाकाराने प्रशासकीय कार्यालयाच्या परिसरातील रस्ते आणि सुंदर अशी बाग तयार केली होती. या प्रसन्न वातावरणात अनेक नागरिक फिरण्यासाठी रोज सकाळ आणि संध्याकाळी येत आहेत. पंचवीसहून अधिक रोपे लावली आहेत. सध्या रोपे मोठी झाल्यामुळे पाटबंधारे कार्यालयाचा परिसर सुंदर दिसत आहे.
ऑनलाइन तासाची वेळ वाढवा
सांगली : जिल्ह्यातील शाळा सध्या ऑनलाइनच सुरू आहेत. यापैकी काही शाळा तीन तास ऑनलाइन शिक्षण घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करीत आहेत; पण काही शाळा एक तासापेक्षा जास्त वेळ ऑनलाइन शिक्षण देत नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम अपूर्ण राहिल्यामुळे पालकांनी किमान घड्याळी दोन तास घेऊन किमान चार विषयांचे तास झाले पाहिजेत, अशी भूमिका घेतली आहे.
सीएचबी शिक्षकांना पगार द्या
सांगली : तासिका तत्त्वावर (सीएचबी) वर जिल्ह्यातील अनेक कनिष्ठ महाविद्यालय आणि महाविद्यालयात शिक्षक काम करीत आहेत. या शिक्षकांना गेल्या दीड वर्षापासून पगार मिळत नाही. या शिक्षकांना शासनाने त्वरित पगार दिले पाहिजेत, अशी शिक्षक संघटनांनी मागणी केली आहे.
नाल्यांवरील अतिक्रमणे काढण्याची मागणी
सांगली : सांगली ते आष्टा बायपास रस्त्यावरील मोठे ओढे, नाले असून तेथे काही उद्योजकांनी अतिक्रमणे केली आहेत. यामुळे पावसाचे पाणी साचून राहत आहे. कृष्णा नदीच्या पुरासही या अतिक्रमाणाचा फटका बसणार आहे. म्हणून महापालिका प्रशासनाने जुना बुधगाव रस्ता ते कर्नाळ चौक येथील अतिक्रमणे काढण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.