लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांनी तयार केलेला लघुउपग्रह रविवारी रामेश्वर तेलंगणा येथून अवकाशात झेपावला. विद्यार्थी, शिक्षकांनी ऑनलाईन उपग्रहाचे प्रक्षेपण पाहिले. उपग्रह अवकाशात सोडताच विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. तीन ते पाच तासांच्या अंतराने निर्धारित वेळेत हे उपग्रह पुन्हा पृथ्वीवर परतले.
रामेश्वर येथे तेलंगणाच्या राज्यपाल तमिलीसाई सौंदर्याराजन यांच्या हस्ते आणि ‘इस्रो’चे माजी संचालक डॉ ए. शिवथानू पिलाई, मार्टिन चॅरिटेबल ट्रस्टच्या ट्रस्टी डाॅ. लिमा रोज मार्टिन व ‘इस्रो’चे डायरेक्टर पद्मश्री डाॅ. मल्लयस्वामी अण्णादुराई यांच्या उपस्थितीत उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी फौंडेशनचे सचिव मिलिंद चौधरी, राज्य समनव्यक मनीषा चौधरी उपस्थित होत्या.
रामेश्वर येथील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आंतरराष्ट्रीय फौंडेशन यांच्या वतीने ‘पे लोड चॅलेंज २०२१’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देशभरातील एक हजार विद्यार्थ्यांनी १०० उपग्रह तयार केले होते. यात सांगली महापालिकेच्या विविध शाळामधील प्रतीक्षा मुडशी, किशोरी मादीग, लखन हाक्के, ओंकार मगदूम, योगेश करवलकर, दर्शन बुरांडे, साकिब सय्यद, समीर शेख, विजय हिरेमठ, राजू भंडारी या १० विद्यार्थ्यांचाही समावेश होता. या विद्यार्थ्यांनी पुणे येथील कार्यशाळेत ओझोन थर, वातावरणातील बदल यांचा अभ्यास करणाऱ्या उपग्रहांची निर्मिती केली. रविवारी रामेश्वरम येथून या सर्वच उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. उपग्रहाेचे प्रक्षेपण होताच विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. आयुक्त नितीन कापडणीस यांनीही शिक्षक, विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या लघुउपग्रह निर्मितीच्या प्रकल्पात महापालिकेचे शिक्षक-शिक्षिका अश्विनी वांडरे, शैलजा कोरे, कल्पना माळी, अनिता पाटील, मांतेश कांबळे, दिनकर आदाटे, सलीम चौगुले, संतोष पाटील, विशाल भोंडवे यांनी विद्यार्थ्यांना मदत केली.
.................................................................................................
चौकट
वातावरणातील बदलाचा अभ्यास
विद्यार्थ्यांनी तयार केलेले लघुउपग्रह हेलियम बलूनच्या साहाय्याने अवकाशात सोडण्यात आले. हे उपग्रह ३५ ते ३८ हजार मीटर उंचीवर स्थिरावले. तीन ते चार तास ते हवेतच स्थिर होते. वातावरणातील बदल, अतिनील किरणे, ओझेनचा थर यांविषयी हे उपग्रह अभ्यास करणार आहेत.
फोटो ओळी :- देशभरातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या लघुउपग्रहाचे रामेश्वरम (तमिळनाडू) येथून राज्यपाल श्रीमती तमिलीसाई सौंदर्याराजन, इस्रोचे माजी संचालक डॉ ए. शिवथानू पिलाई, मार्टिन ट्रस्टच्या ट्रस्टी डाॅ. लिमा रोज मार्टीन व इस्रोचे डायरेक्टर पद्मश्री डाॅ. मल्लयस्वामी अण्णादुराई यांच्या उपस्थितीत प्रक्षेपण करण्यात आले.