सांगली : विद्यापीठ कायदा २०१६ मधील तरतुदीनुसार शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्रासाठी जिल्ह्याच्या मुख्यालयापासून २५ किलोमीटरच्या आतील जागा देण्याची मागणी खुद्द विद्यापीठानेच केली आहे. शिक्षणमंत्र्यांनी कोणालाच विश्वासात न घेता बस्तवडेत उपकेंद्रासाठी तत्त्वत: मान्यता दिली आहे. हे उपकेंद्र सांगलीजवळच हवे, असे मत उपकेंद्र कृती समितीचे निमंत्रक ॲड. अमित शिंदे यांनी व्यक्त केले.
शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये उपकेंद्र व्हावे, अशी मागणी सुरू झाली आहे; परंतु कायद्यातील तरतूद पाहिल्यास उपकेंद्रासाठी केवळ जागा किंवा भौगोलिक क्षेत्र इतकाच निकष नाही. तरतुदीनुसार ते केंद्र हे जिल्ह्याचे प्रवेशद्वार असणार आहे. प्रशासकीय सोयीसोबतच संशोधन, शैक्षणिक विस्तार, विस्तारित उपक्रम तसेच विद्यापीठाची कार्यक्षमता व प्रभाव वाढण्याच्या दृष्टीने या केंद्राची निर्मिती करावयाची आहे. त्याचबरोबर विद्यार्थी, महाविद्यालय, शिक्षक व कर्मचारी असा ज्यांचा प्रत्यक्ष संबंध विद्यापीठाशी येणार आहे, त्यांची संख्या सांगली, मिरज, कुपवाड भागात सर्वात जास्त आहे. त्यांना येणे-जाणे सोयीचे व्हावे, वाहतूक व्यवस्था, रेल्वे व इतर सोयीसुविधा जवळ असणे आवश्यक आहे. त्यामुळे हे उपकेंद्र सांगली व मिरज शहरालगत होणे आवश्यक आहे.
हे केंद्र तासगाव तालुक्यातील बस्तवडे गावी करण्यासाठी तत्त्वतः मान्यता मिळाल्याचे समजते. बस्तवडे हे ठिकाण जिल्ह्याच्या मुख्यालयापासून ४५ किलोमीटर लांब पडते व जाण्यासाठी २ ते अडीच तासांचा कालावधी लागतो. समितीच्या माध्यमातून आम्ही कुलगुरु, जिल्हाधिकारी व राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता;
परंतु शिक्षणमंत्र्यांनी बैठक घेताना सर्वांना विश्वासात घेतले नाही, तरीही जिल्ह्याच्या ठिकाणापासून २५ किमीच्या अंतरावरील जागेलाच अंतिम मान्यता मिळणार आहे. मग ती कोणत्याही मतदारसंघात येवो. उपकेंद्र म्हणजे दुष्काळ निवारणाचे केंद्र नाही. त्यामुळे ते सांगलीजवळच उभारायला हवे.
यासंदर्भात समितीची बैठक पार पडली. यावेळी रोहित शिंदे, तेजस नांद्रेकर, अभिषेक खोत, सागर माळी, महालिंग हेगडे, जयंत जाधव, आदित्य नाईक, अनिरुद्ध हजारे, मयूर लोखंडे आदी उपस्थित होते.