मिरजेतील प्रभाग २० मध्ये समतानगर येथे १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. येथे लसीकरणासाठी परजिल्ह्यातूनही नागरिक येत आहेत. येथील नगरसेवक संगीता हारगे यांनी स्थानिक लोक लसीपासून वंचित राहात आहेत, त्यांना प्रथम लस द्यावी. परजिल्ह्यातील नागरिक मिरजेत लसीकरण करतात. यामुळे नोंदणी करताना लसीकरणाचे ठिकाण जवळचे असावे ही अट घालावी. त्यामुळे स्थानिक नागरिकांना या लसीकरणाचा फायदा होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र या प्रभागातील राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी सर्वांना लसीकरणाचा फायदा व्हावा. फक्त गल्लीचा विचार न करता सर्वांचे लसीकरण व्हावे. काही जणांना केवळ आपल्या गल्लीतच लोकांना लस मिळावी, आपल्या मतदारांचेच लसीकरण व्हावे असं वाटतं, मात्र त्याऐवजी सर्वांनाच लस मिळाली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. यामुळे लसीकरणावरूनही मिरजेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा परस्परविरोधी भूमिका घेत आहेत. मात्र लसीकरणाबाबत नगरसेवकांचे काहीही मत असले तरी शासनाच्या निर्देशानुसार लसीकरण सुरू असल्याचे महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मिरजेत लसीकरणासाठी राष्ट्रवादी नगरसेवकांत संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:28 IST