नेर्ले (ता.वाळवा) येथे सभासद संपर्कदौऱ्यात कृष्णाचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जालिंदर पाटील, उदयसिंह शिंदे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर्ले : साखरेला दर कमी असूनही आम्ही एफआरपीपेक्षा दोनशे ते तीनशे रुपये उसाला अधिक दर दिला. परंतु सत्ताधाऱ्यांनी मात्र साखरेला दर ज्यादा असूनही एफआरपी एवढाच दर दिला. कृष्णाची वाटचाल ही खासगीकरणाकडे चालू असून ही प्रवृत्ती येत्या निवडणुकीत रोखा, असे आवाहन संस्थापक पॅनेलचे प्रमुख कृष्णाचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी केले.
नेर्ले (ता. वाळवा) येथे माळी मळा व सदा पाटील मळा या ठिकाणी आयोजित केलेल्या सभासद संपर्कदौऱ्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, सभासदांना अक्रियाशील ठरवणे, सभासदांचे राजीनामे घेणे हे कारखाना खासगीकरणाचे लक्षण नव्हे तर काय आहे. संस्थापक पॅनेलने आपल्या कारकीर्दीत विविध योजना राबवून सभासदांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला. राजकीय षङ्यंत्र रचून सत्ताधाऱ्यांनी संस्थापक पॅनेलला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. कृष्णेच्या येणाऱ्या निवडणुकीत संस्थापक पॅनेलच्या पाठीशी ठामपणे उभे रहा.
यावेळी राजाराम माळी, जीवन माने, माजी संचालक वसंतराव पाटील, संचालक सुभाष पाटील, उदयसिंह शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. जालिंदर पाटील यांनी आभार मानले.
कार्यक्रमास सतीश पाटील, शुभम पाटील, बबन दादा माळी, मारुती माळी, चंद्रकांत पाटील, मोहन पाटील, बाबूराव पाटील, राहुल पाटील, विक्रम पाटील उपस्थित होते.