सांगली : नागरिकांची बाजू घेऊन भांडणाऱ्या सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांचा पोलीस व प्रशासनाशी मतभेद होऊ शकतात, मात्र त्यातून अकारण संघर्ष व कारवाईची भूमिका घेऊ नये, अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीने शनिवारी जिल्हाधिकारी व जिल्हा पाेलीसप्रमुखांकडे केली.
समितीचे सतीश साखळकर, महेश पाटील, प्रशांत भोसले, आनंद देसाई यांनी प्रत्यक्ष भेटून अधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, सांगलीतील नळभाग परिसरातील पोलीस कारवाईने लॉकडाऊनच्या परिस्थितीत नागरिकांत घबराहट दिसून येत आहे. पोलीस प्रशासनाकडून होणारा बंदोबस्त व बंदोबस्तादरम्यान नागरिकांच्यातून दिसणारा असंतोष सद्य परिस्थितीत समजून घेण्याजोगा आहे. लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांत असंतोष आहे. अशा परिस्थितीमध्ये समाजातील प्रमुख लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांना नागरिकांची बाजू घेऊन वेळप्रसंगी प्रशासनाशी संघर्ष करावा लागतो . यातून प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये गैरसमज, तक्रारी होण्याची शक्यता नेहमीच असते, पण याचा अर्थ प्रशासनाने लोकप्रतिनिधींना समाजकंटकाच्या भूमिकेत उभे करणे योग्य नाही.
आसिफ बावा व मित्रपरिवार नेहमी समाजात सलोखा राखण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असतात. दलित, मुस्लीम, बहुजन समाजासहीत सर्व समाजात व सर्व स्थरात काम करतात. नळभागात मागील आठवड्यात पोलीस व नागरिकांत हुज्जत होत असताना मध्यस्थीसाठी आलेले आसिफ बावा व काही तरुणांची पोलिसांशी वादावादी झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. असे असले तरी यापैकी सर्व तरुण योग्य व्यवसाय करून निवारा करणाऱ्या वर्गातील असून कोणीही समाजकंटक अथवा गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नाहीत.
त्यामुळे याप्रकरणी सलोखा राखून पोलीस कारवाई सौम्य करावी. पोलीस प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सलोख्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर पृथ्वीराज पवार, हणमंत पवार, नगरसेवक संतोष पाटील, अभिजित भोसले, मंगेश चव्हाण, अमर पडळकर, आश्रफ वांकर, उमेश देशमुख, महेश खराडे, डॉ संजय पाटील, प्रशांत भोसले, अविनाश जाधव, राहुल पाटील, किरणराज कांबळे, सुरेश दुधगावकर, ज्योती आदाटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.