जत : तालुक्यातील बेळोंडगी ओढापात्रालगत असलेला विनापरवाना वाळूसाठा जप्त करून खासगी वाहनातून उमदी (ता. जत) पोलीस ठाण्याकडे घेऊन जात असताना वाळू तस्करांनी तहसीलदारांच्या गाडीवर दगडफेक केली. हा प्रकार काल, गुरुवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान घडला. दगडफेकीत कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी तहसीलदार ज्ञानू कांबळे यांनी वाळू तस्कर तम्माराया शिवाप्पा हत्तळ्ळी (बिराजदार, रा. बेळोंडगी), त्याचा भाऊ आणि इतर अज्ञात पाच ते सहाजणांविरोधात पोलिसांत फिर्याद दाखल केली. बेळोंडगीपासून एक किलोमीटरवर करजगी रस्त्यालगत ओढापात्रालगत वाळू तस्कराने सुमारे पन्नास ब्रास वाळूसाठा करून ठेवला आहे, असा निनावी दूरध्वनी तहसीलदार कांबळे यांना सकाळी नऊच्या सुमारास आला. त्यानंतर सकाळी अकरा वाजता खासगी जीपमधून (एमएच१० बीए ८४०२) कोतवाल अशोक माळी व चालक कुमार कोळी यांच्यासमवेत ते निघाले. दुपारी एकच्या सुमारास बेळोंडगी ओढापात्रात पोहोचले असता, त्यांना तेथे सुमारे पन्नास ब्रास अनधिकृत वाळूसाठा दिसून आला. यासंदर्भात त्यांनी गावात जाऊन महिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे वाळूसाठा जप्त करून आसपासच्या सर्व तलाठ्यांना दूरध्वनी करून वाळूसाठा उमदी पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यासाठी खासगी वाहन आणण्याचे आदेश त्यांनी दिले. सायंकाळी पाच वाजता मोरबगी व करजगी येथील पाच ट्रॅक्टर तेथे आले होते. सहाच्या सुमारास ट्रॅक्टरमध्ये वाळू भरत असताना तम्माराया हत्तळ्ळी व इतर दोन अनोळखी दुचाकीवरून तेथे आले. अधिकाऱ्यांजवळ न थांबता ते तसेच ओढापात्रातून पुढे गेले. त्यानंतर पंधरा-वीस मिनिटांनी पाच ते सहाजणांनी वाळू भरत असलेल्या ठिकाणी व तहसीलदारांच्या गाडीवर लांबून दगडफेक सुरू केली. बचावासाठी सर्वजण रस्त्यावर आले. यावेळी तम्माराया भावासह तेथे आला. दरम्यान, सर्वच ट्रॅक्टर ओढापात्रातून बाहेर काढण्यात आले होते. ‘हा वाळूसाठा आम्ही केला आहे, तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही, तुम्हाला बघून घेतो,’ अशी दमदाटी करत तम्माराया यांच्या भावाने तहसीलदार कांबळे यांना ढकलून दिले आणि पोबारा केला. त्यानंतर कांबळे यांनी उमदी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. याप्रकरणी अद्याप कोणासही अटक करण्यात आलेली नाही. तालुक्यातील वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी उपाययोजना करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार कांबळे यांनी दिली. (वार्ताहर) भाळवणीतही महसूल पथकाला धक्काबुकीविटा : भाळवणी (ता. खानापूर) येथील येरळा नदीपात्रातून होणारी वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकाला वाळू तस्कराने धक्काबुक्की केल्याची घटना काल, गुरुवारी रात्री आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी वाळू तस्कर मोहन गणपती मोहिते (रा. भाळवणी) याच्याविरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार अंजली मरोड यांना भाळवणीतील शिंदे मळा येथे वाळू तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर, त्यांनी गावकामगार तलाठी श्रीकृष्ण निकम, आळसंदचे तलाठी एम. एन. पाटोळे, रेवणगावचे तलाठी व्ही. ए. पाटील व माहुलीचे तलाठी व्ही. आर. कदम यांचे पथक गुरुवारी रात्री पाठविले. त्यावेळी विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत वाळू भरत असताना मोहन मोहिते यास पथकाने रंगेहात पकडले. ट्रॅक्टर तहसील कार्यालयात घेऊन चलण्यास त्याला सांगितले. तेव्हा चालक मोहितेने पथकातील कर्मचाऱ्यांशी उद्धट वर्तन करीत त्यांना धक्काबुक्की केली व ट्रॅक्टर घेऊन पलायन केले. आज, शुक्रवारी सायंकाळी मोहितेविरुद्ध तलाठी श्रीकृष्ण निकम यांनी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
तहसीलदारांच्या वाहनांवर दगडफेक
By admin | Updated: January 23, 2015 23:42 IST