लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : पालिकेच्या नियोजनाअभावी शहरातील विविध पुतळे आणि परिसर दुर्लक्षित होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि परिसराची स्वच्छता कोलमडली आहे. काही विशेष कार्यक्रमानिमित्तच हे पुतळे अग्निशमनच्या प्रेशर पाईपने धुतले जातात. त्यामुळे पुतळ्याचे रंग उडत आहेत. तसेच परिसरातील चार बाजूचे रस्ते जीवघेणे खड्डे बनले आहेत. याची पालिकेने दखल घ्यावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली आहे.
येथील तहसील कार्यालयासमोर लोकवर्गणीतून युद्धपातळीवर इस्लामपूर पालिकेने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला आहे. या पुतळ्याची स्वच्छता आणि पूजन करण्याचे काम शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते प्रवीण पाटील, मंदार चव्हाण, अविनाश जाधव, बाळासाहेब गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते नित्यनियमाने करतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना रोजच नवीन पुष्पहार घातला जातो.
परंतु अलीकडे काही दिवस या परिसरात अस्वच्छता आहे. येथील असलेल्या कारंजाची पाण्याची टाकी लिकेज झाली आहे. त्यामुळे कारंजे बंद आहेत. सुशोभित विजेची व्यवस्थाही कोलमडली आहे. याची अनेकवेळा पालिकेकडे तक्रार केल्यानंतर अग्निशमन दलाची गाडी येऊन जास्त दाबाच्या पाईपने पुतळे आणि परिसर साफ केला जातो. यासाठी शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते नेहमीच सतर्क आहेत. परंतु पुतळा परिसरातील सुशोभिकरणाच्या दुरुस्तीकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रंगरंगोटी करणे गरजेचे आहे. तरी शहरातील सर्व पुतळ्यांकडे पालिका प्रशासनाने लक्ष देऊन गांभीर्याने पाहिले पाहिजे, अशी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे.
कोट
अग्निशामक दलाच्या पाईपने पुतळे स्वच्छ करणे योग्य नाही. यासाठी शहरातील सर्व पुतळ्यांची स्वच्छता करण्यासाठी छोटे मशीन घेण्यात येईल. पालिकेच्या फंडातून पुतळ्याची देखभाल आणि परिसराचे सुशोभिकरण करण्यात येईल.
आनंदराव पवार, गटनेता, जिल्हा प्रमुख, शिवसेना
फोटो - ०५०२२०२०-आयएसएलएम - इस्लामपूर न्यूज
इस्लामपुरातील तहसील कार्यालयासमोर असलेल्या पुतळ्यांची स्वच्छता अग्निशमन दलाच्या जास्त दाबाच्या पाण्याच्या पाईपने केली जाते.