लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत असलो तरी एसटी कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी स्व. बिराज साळुंखे यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून अखंडित लढा देत राहणार आहे. पूर्णवेळ एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढणार आहे, असा विश्वास महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे राज्य चिटणीस विलास यादव यांनी व्यक्त केला.
एसटीच्या सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल विलास यादव यांचा कामगारांतर्फे सांगली विभागीय कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी यादव बोलत होते. ते पुढे म्हणाले की, स्व. बिराज साळुंखे यांच्यासारख्या नि:स्वार्थी व्यक्तींबरोबर कामगारांचा लढा उभारला. कामगारांचे अनेक प्रश्न सोडविण्यात यश आले. मी सध्या एसटीच्या प्रशासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहे. पण, भविष्यात एसटी वाचविण्यासाठी आणि कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी अखंडित लढा उभारण्यात येणार आहे. कामगारांचे अनेक प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहेत. वेतन करार आणि सेवानिवृत्तांची थकीत देणी, असे अनेक प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांसमोर आहेत. हे सर्व प्रश्न शासनाकडे लढा देऊन सोडविणार आहे, असा विश्वासही यादव यांनी कामगारांना दिला.
यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश हंकारे, विभागीय अध्यक्ष युवराज शिंदे, सांगली आगार सचिव अरुण जाधव, माजी अध्यक्ष विलास चव्हाण, विकास माने लालासाहेब मोहिते, राजेंद्र पवार, अनिल कांबळे, राजू पवार, अजित भोसले, जत आगार अध्यक्ष महेश पाटील, विभागीय खजिनदार प्रकाश कदम, दत्ता माळी आदी उपस्थित होते.