पुनवत : शिराळा तालुक्यात अलीकडे काही महिन्यात तण प्रकारातील अनोख्या वनस्पतीचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला असून, रस्त्यांच्या दुतर्फा तसेच शेतकऱ्यांच्या शेतात या वनस्पतीचे आता वेगाने आक्रमण होऊ लागल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. कृषी किंवा वन विभागामार्फत याबाबत शेतकऱ्यांचे प्रबोधन व्हावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.शेतकऱ्यांना नेहमीच शेतात नवनवीन प्रकारच्या तणांचा त्रास होत असतो. तणांचा नायनाट करताना शेतकरी अगदी मेटाकुटीला येतात. भांगलणीसाठी मजूर मिळत नसल्याने वेगवेगळ्या प्रकारची खर्चिक तणनाशके वापरून शेतकरीवर्ग या तणांचा बंदोबस्त करतात.शिराळा तालुक्यात अलीकडे खाऊच्या पानासारखी पाने असणाऱ्या, हिरव्यागार व पिकापेक्षाही मोठ्या जोमाने वाढणाऱ्या व वाऱ्यामार्फत प्रसार होणाऱ्या तण जातीतील एका अनोख्या वनस्पतीचा फैलाव झाला आहे. दिवसेंदिवस या वनस्पतीचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे.सुरुवातीला रस्त्यांच्या दुतर्फा दिसणारी ही वनस्पती आता शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर व पिकांमध्येही फोफावू लागली आहे. विशेष म्हणजे या वनस्पतीला कोणतेही जनावर खात नसल्यामुळे वैरण म्हणूनही या वनस्पतीचा उपयोग होत नाही. अनेक तज्ज्ञ शेतकऱ्यांनासुद्धा या वनस्पतीचे नाव माहीत नाही.सध्या तालुक्याच्या अनेक भागातील रस्ते या वनस्पतीने वेढले आहेत. या वनस्पतीला येणाऱ्या बोंडातून याचा बीजप्रसार होत आहे. पूर्वी ही वनस्पती नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. पाणथळ व कोरड्या जागेतही ही वनस्पती जोमाने वाढत आहे. वारणा डावा कालव्याच्या भरावावर सर्रास ही वनस्पती नजरेस पडत आहे. अनेक ठिकाणी जाळीच्या रुपाने आठ-दहा फुटांपर्यंत हिची वाढ झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.तालुका कृषी विभाग किंवा संबंधित विभागाने याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून याच्या बंदोबस्ताचे उपाय सांगावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
शिराळा तालुक्यात अनोख्या वनस्पतीचा फैलाव
By admin | Updated: November 19, 2014 23:21 IST