लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शिस्तप्रिय वर्तन पोलीस दलाचे नाक समजले जाते. मात्र, जिल्हा पोलीस दलातील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या कारनाम्यांनी पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत आहे. काही दिवसांपूर्वी एका सहायक पोलीस निरीक्षकावर तरुणीने बलात्काराचा आरोप केलेले प्रकरण ताजे असतानाच आता एक पोलीस निरीक्षकच वेश्या अड्ड्यावर ग्राहक म्हणून सापडला. जनतेला कायदा, सुव्यवस्था व नियमांचे धडे देणारेच नियम पायदळी तुडवत असल्याने आता पोलीस अधीक्षकांनीच अशा बेशिस्तांवर कडक कारवाईसाठी बडगा उगारण्याची आवश्यकता आहे.
सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पाेलीस २४ तास कर्तव्यावर असले तरी दलातीलच काही कळीचे नारद पोलीस दलास बदनाम करत आहेत. अनेक अधिकारी प्रभावी कामगिरी करत असले तरी मोजक्या अधिकाऱ्यांचे वर्तन चुकीचे ठरत आहे. काही दिवसांपूर्वी कडेगाव येथील तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षकावर तरुणीने बलात्काराचा आरोप केला होता. आता हायप्रोफाइल वेश्या अड्ड्यावर आटपाडीच्या पाेलीस निरीक्षकास अटक करण्यात आली.
असे असले तरी गेल्या महिनाभरात पोलिसांनी प्रभावी कामगिरी केली आहे. त्यात शेगाव येथील सव्वादोन कोटींच्या दरोड्याचा छडा असो किंवा बनावट नोटा छापणारी टोळीचा पर्दाफाश आणि दरोड्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्य टोळीला जेरबंद करून पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक मिळवले असले तरी, शहरात वाढत असलेल्या घरफोडीच्या घटना अद्यापही कायम आहेत. सांगलीतील मध्यवर्ती बसस्थानकावर वारंवार चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पोलीस दलाची उल्लेखनीय कामगिरी अशा पोलीस अधिकाऱ्यांमुळे झोकाळून जात आहे.
चौकट
तीन महिन्यांपूर्वीच जिल्ह्याची सूत्रे स्वीकारलेल्या अधीक्षक गेडाम यांनी प्रशासनावर वचक निर्माण केला आहे. आव्हानात्मक गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना बक्षीस जाहीर करून त्यांंच्या पाठीवर शाबासकीचीही थाप ते देत असतात. त्यामुळे पोलीस दलात ‘रिवार्डेबल ऑफिसर’ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे आता अधीक्षकांनीच अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
चौकट
शिराळा, जत तालुक्यासह सांगलीत वारणानगर लुटीतील प्रमुख संशयिताच्या खुनाच्या घटना घडल्या आहेत तर ऑनलाइन पद्धतीने सर्वसामान्यांना गंडा घालण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातच शहरातील मुख्य मार्गावर बाहेरगावाहून आलेल्या ट्रकचालकांना धाक दाखवून लुटण्याचेही प्रकार घडले आहेत. शहरात दुचाकींची चोरी करणारे व घरफोडी करणाऱ्या टोळ्या अटकेत असल्या तरी हळूहळू क्राइम रेट वाढत असल्याचे चित्र आहे.