लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : देशभर लवकरच ‘वन नेशन, वन पीयूसी’ धोरणाची अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी पीयूसी चालकांच्या शिष्टमंडळाला दिले.
नीता केळकर यांनी या शिष्टमंडळासह दिल्लीमध्ये गडकरी यांची भेट घेतली. परिवहन विभागातल्या विविध सेवा व पुरवठा करणाऱ्यांच्या प्रश्नाबाबत त्यांच्याशी चर्चा केली. पीयूसी चालक संघटनेचे अध्यक्ष संदेश भंडारी, कुमार भोसले आदी उपस्थित होते. वाहनांना बसविण्यात येणाऱ्या रिफ्लेक्टरची केवळ तीनच कंपन्यांकडून मान्यताप्राप्त असल्याने याचा वाहनधारकांना त्रास होत आहे. त्याच्या किमतीही खूप आहेत. त्यामुळे यात सुधारणा करण्याची गरज आहे. परिवहन अधिकाऱ्यांकडे वारंवार नूतनीकरणासाठी जावे लागत असल्याने आता यासुद्धा गोष्टी ऑनलाईनच कराव्यात अशी भावना चालकांनी व्यक्त केली. नवीन वाहन नोंदणीही आता ऑनलाईनच केल्यामुळे वाहन वितरकांनी समाधान व्यक्त केले. इलेक्ट्रिकल दुचाकी वाहनांच्या किमती कमी केल्याच्या गडकरी यांच्या निर्णयाचे वाहन वितरक सारंग केळकर यांनी स्वागत केले.