आटपाडी : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात आटपाडी, शेटफळे आणि नेलकरंजीचा समावेश करण्यात आला आहे. या अभियनांतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प या गावांत राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी आराखडा बनवण्याचे काम सुरू आहे.
केंद्र सरकारने २०१४ पासून स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात गावे हगणदारीमुक्त केली. सध्या घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प सुरू केला आहे. आटपाडी तालुक्यातील आटपाडी, शेटफळे आणि नेलकरंजी गावांचा समावेश झाला आहे. तिन्ही गावांतील सांडपाण्याचे एकत्रीकरण करण्याचे व्यवस्थापन केले जाणार आहे. ओला, सुका आणि इतर कचरा संकलित करून प्रक्रिया केली जाणार आहे. गावात नव्याने बंदिस्त गटर, चौकाचौकात कचराकुंडी, घंटागाडी आणि घनकचरा यंत्रणा उभी केली जाणार आहे. प्रकल्पाचे काम पाच वर्षे चालू राहणार आहे. त्याचा आराखडा बनवण्याचे काम दिल्लीतील संस्थेला दिले असून त्यांनी तिन्ही गावांना भेट देऊन गावची पाहणी करून कच्चा आराखडा तयार केला आहे. लवकरच अंतिम आराखडा तयार करून प्रशासनाकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर प्रकल्पाची अंमलबजावणी होणार आहे.
यावेळी सरपंच सौ. वृषाली पाटील, ॲड. धनंजय पाटील, उपसरपंच प्रा. अंकुश कोळकर, प्रकाश मरगळे, बाळासाहेब मेटकरी, विजय पाटील, नितीन सागर, राजेंद्र बालटे, सर्जेराव राक्षे, उमाकांत देशमुख, मधुकर माळी उपस्थित होते.