इस्लामपूर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मिठ्ठी सत्याग्रह करण्यात आला. यावेळी विश्वास सायनाकर, धनाजी गुरव, दिग्विजय पाटील, प्रा. एल. डी. पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : स्वातंत्र्य चळवळीत हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या भूमीतील मूठभर माती उचलून ‘मिठ्ठी सत्याग्रह’ करण्यात आला. येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील माती संकलित करण्यात आली. ‘हुतात्म्यांच्या रक्तात भिजलेली माती - विकू देणार नाही’ अशी प्रतिज्ञा करण्यात आली.
हुतात्म्यांच्या मातीचे कलश सांगली येथे एकत्र करून आमराईत हुतात्मा पत्रावळे यांच्या पुतळ्याजवळ वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तर त्या मातीतील निम्मा भाग दिल्लीच्या आंदोलनासाठी पाठवला जाणार आहे. संयुक्त किसान मोर्चाने हा सत्याग्रह सुरू केला आहे. यावेळी ज्येष्ठ विचारवंत निवृत्त प्राचार्य विश्वास सायनाकर, धनाजी गुरव, प्रा. एल. डी. पाटील, दिग्विजय पाटील उपस्थित होते.
धनाजी गुरव म्हणाले, संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने देशभर आंदोलने सुरू आहेत. महात्मा गांधींनी १२ मार्च ते ६ एप्रिल १९३० असा मिठाचा सत्याग्रह करणारा दांडी मार्च काढला होता. त्याच पद्धतीने ‘मिठ्ठी सत्याग्रह’ देशभर होत आहे. सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना, पुरोगामी आणि समाजवादी पक्ष संघटना या कार्यक्रमात सहभागी झाल्या.
दिग्विजय पाटील म्हणाले, या सत्याग्रहाची सुरुवात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पत्री सरकारचे कार्यकर्ते भगवानराव मोरे यांच्या हणमंतवडीये या गावातून झाली. क्रांतिवीरांगणा हौसाक्का पाटील यांच्या हस्ते मूठभर माती उचलून सत्याग्रह सुरू झाला. सांगली जिल्ह्यात जेथे जेथे इंग्रजांच्या विरोधातील लढ्यात हुतात्मे झाले, तेथील माती एकत्रित करून सत्याग्रह करण्यात येत आहे.