मिरज : महानगरपालिकेला स्थापन होऊन तब्बल २८ वर्षे पूर्ण होऊन महापालिकेची सहावी निवडणूक होत आहे. मात्र, या कालावधीत मिरज शहराचा अपेक्षित विकास झाला नाही. महापालिका अस्तित्वात येताना पाहिलेली स्वप्ने आजही अपूर्णच असून, नागरिकांचा स्वप्नभंग झाल्याची भावना आहे.९ फेब्रुवारी १९९८ रोजी तत्कालीन मिरज नगर परिषदेचे अस्तित्व संपुष्टात येऊन सांगली–मिरज–कुपवाड महापालिकेची स्थापना झाली. महापालिकेमुळे शहराचा विकास होईल,अशी अपेक्षा होती. मात्र २८ वर्षांनंतरही मिरज शहर विकासकामांच्या बाबतीत ‘जैसे थे’ स्थितीतच आहे. शहरातील रस्ते, नियोजनबद्ध विकास, स्वच्छ पाणी, ड्रेनेज व्यवस्था, उद्याने खेळाची मैदाने या नागरिकांच्या किमान अपेक्षाही पूर्ण झाल्या नाहीत.
२८ वर्षांत शहरातील मूलभूत प्रश्न, तसेच कायम आहेत. रस्त्यांची दुरवस्था, अरुंद रस्ते,खड्डे, वारंवार खुदाई, पाणीपुरवठ्याचा प्रश्न, सदोष ड्रेनेज व्यवस्था, वाढते अतिक्रमण या समस्या सोडविण्याचे आश्वासन प्रत्येक निवडणुकीत मिळते. पण ते पूर्ण होत नाहीत. महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधीतील नियोजनाचा अभाव शहराच्या प्रगतीला अडसर ठरत आहे.महापालिकेच्या स्थापनेपासून आतापर्यंत अर्थसंकल्पात मोठा निधी मिरज शहराच्या विकासासाठी दाखवला, मात्र प्रत्यक्षात ठोस व दर्जेदार काम दिसत नसल्याने निधीच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होते. मिरज शहरात गांधी चौक–मंगळवार पेठ चर्च–बॉम्बे बेकरी, हिरा हॉटेल चौक ते गुरुवार पेठ, बालगंधर्व नाट्यगृह–भानू तालीम–जिलबी चौक–मालगाव वेस, नागोबा कट्टा ते गणेश तलाव, तसेच छत्रपती शिवाजी रस्ता या प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण गेली तीन दशके रखडली आहेत. बेकायदा बांधकामे, अनधिकृत टपऱ्या व खोक्यांमुळे वाहतूक कोंडीचा त्रास आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर रस्ते डांबरीकरण, पॅचवर्क, पेव्हिंग ब्लॉक्स व काँक्रीटीकरणाची कामे होतात. ही कामे दीर्घकालीन उपाय ठरत नाहीत. निवडणूक संपताच पुन्हा परिस्थिती जैसे थे होते, हा मिरजकरांचा अनुभव आहे. गत निवडणुकीपूर्वी सुमारे १३ कोटी खर्चांच्या खंदकातील भाजी मंडईच्या कामाचा नारळ फोडला होता. मात्र, ही मंडई झाली नाही. मोकळे फुटपाथ, स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहे, महिलांसाठी सुविधा, चांगली उद्याने, खेळाडूंसाठी अत्याधुनिक मैदान, सुस्थितीतील नाट्यगृह, चौकांत सिग्नल यंत्रणा या मूलभूत गरजा आजही अपूर्णच आहेत. २८ वर्षांत एकही मोठा नागरी प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही, हे महापालिकेच्या कार्यक्षमतेचे द्योतक आहे.
निवडणूक बदलाची सुरुवात ठरावीमहापालिकेची सहावी निवडणूक ही केवळ पक्षीय राजकारणापुरती मर्यादित नाही. ती मिरज शहराच्या भवितव्याची निवडणूक आहे. मिरज शहराचा विकास केवळ आश्वासनांवर थांबू नये, ही निवडणूक बदलाची सुरुवात ठरावी, हीच मिरजकरांची अपेक्षा आहे.
उपमुख्यमंत्र्यांकडून कानउघडणीमिरजेतील नगरसेवकांना सहा वेळा महापौर व स्थायी समिती सभापती पदाची संधी मिळाली आहे. मात्र, मिरज शहराच्या विकासाकडे या मंडळींनी दुर्लक्ष केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मिरज शहराचे बकाल स्वरूप सुधारा, अशी सूचना या माजी नगरसेवकांना केली आहे.