पलूस : पहलगाम बेसरन घाटीमधील दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यटकांचा समावेश असून यातील दोन पर्यटक महाराष्ट्रातील आहेत. याच पहलगामच्या एक किलोमीटर अंतरावर पलूस येथील सहा पर्यटक गेले होते. मात्र हे सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती कोल्हापूर येथील टुर्सच्या वतीने देण्यात आली.याबाबत अधिक माहिती अशी, पलूस येथील पर्यटक विजय कटारे, नारायण सगरे, प्रकाश डाके, महादेव माने, विजय लाड, जितेंद्र देसाई हे कोल्हापूर येथील टुर्सच्या माध्यमातून जम्मू व काश्मीरला फिरायला गेले होते. मंगळवारी पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर हे सर्व पर्यटक एका ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेत असताना त्यांच्या गाइडला फोन आला व पहेलगाममधील बेसरन घाटी येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. तरी तुम्ही ते ठिकाण सोडून सुरक्षित ठिकाणी जावे, अशा सूचना देण्यात आल्या. यावर टुर्सच्या प्रमुख व गाइड यांनी ते ठिकाण सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले.
संदेश येताच सुटकेचा नि:श्वासपलूसमधील सहाही पर्यटकांचा नातेवाइकांशी संपर्क झाला असून हे सर्व सहा पर्यटक सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. ही बातमी पलूससह परिसरात वाऱ्यासारखी पसरली. जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यानंतर बराच काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र काही वेळाने हे सर्व पर्यटक सुखरूप असल्याचा संदेश येताच सहा कुटुंबीय व नातेवाईक तसेच पलूसकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. लवकरच हे सहा पर्यटक सुखरूप घरी परत येतील, असे नातेवाइकांनी सांगितले.