लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : स्मार्टफोनच्या या युगात मोबाईल नंबर कुणाला पाठ असतात, असे म्हटले जाते. पण किमान घराच्या मंडळीची तरी नंबर पाठ असावेत, अशी माफक अपेक्षा असते. या साऱ्याला छेद देणाऱ्या प्रकार ‘लोकमत’च्या रियालिटी चेकमध्ये आढळून आला. दहापैकी सहा जणांना बायकोचाच मोबाईल नंबर पाठ नव्हता. याउलट महिलांना मात्र पतींचे नंबर तोंडपाठ असल्याचे दिसून आले.
मोबाईलमध्ये नंबर सेव्ह केले असल्याने तोंडपाठ ठेवण्याची गरजच काय, असा प्रश्नही काहीजणांनी उपस्थित केला तर काहींनी घराच्या व्यक्तींसह महत्त्वाच्या लोकांचे नंबर फेव्हरेट वर्गात टाकले आहेत. त्यामुळे काॅन्टॅक्ट यादी उघडताच हे नंबर सर्वप्रथम स्क्रीन येतात. त्यामुळे मोबाईल नंबर पाठ करण्याची आवश्यकताच भासली नसल्याचे अनेकांनी सांगितले.
चौकट
लोकमत @ राममंदिर चौक
१. राममंदिर चौकातील चहा पिण्यासाठी टपरीवर आलेल्या एका व्यक्तीला पत्नीचा नंबर विचारला असता त्याला सांगता आला नाही.
२. चौकातील दुकानदाराला घरापैकी कुणाचाच नंबर आठवत नव्हता. पण व्यवसायाशी संबंधित व्यापाऱ्याचा नंबर मात्र माहीत होता.
३. एका व्यक्तीला मात्र पत्नीचा मोबाईल नंबर पाठ होता. त्याचसोबत ऑफिसमधील बाॅसचाही नंबर त्याने पाठ करून ठेवला होता.
चौकट
तरुणापासून वृद्धापर्यंत सारेच सारखे
१. एकूण दहाजणापैकी सहा जणांना पत्नीचा मोबाईल नंबर आठवला नाही. त्यात दोन वृद्धांचाही समावेश होता. एका वृद्धाकडे स्मार्ट फोन असून त्याला तो कसा वापरावा, हेच माहीत नव्हते.
२. दोन तरुणांनाही पत्नीचे मोबाईल नंबर पाठ नव्हता. एक तरुण पत्नीसह आला. त्यालाही नंबर माहीत नव्हता. पण त्याच्या पत्नी मात्र नवऱ्याचा नंबर तोंडपाठ होता.
३. तरुणापासून वृद्धापर्यंत सारेच नंबरसाठी मोबाईलवर अवलंबून असल्याचे आढळून आले.
चौकट
बायकांनाही पतीदेवाचा नंबर तोंडपाठ
बायकांना मात्र पतीदेवाचा नंबर तोंडपाठ असल्याचे दिसून आले. विश्रामबाग परिसरातील एका महिलेला विचारले असता तिने पतीचा मोबाईल नंबर पाठ आहे. दिवसभरातून दोन ते तीनदा संपर्क होतो. त्यामुळे नंबर लक्षात राहिला असल्याचे सांगितले तर दुसऱ्या एका महिलेलाही नंबर तोंडपाठ होता पण त्यांना पतीचा दुसरा मोबाईल नंबर काही आठवला नाही.
चौकट
पोरांना मात्र आई-बाबांचा नंबर पाठ
सुजल पाटील या विद्यार्थ्याने आई-बाबासह काका व मामांचा मोबाईल नंबर सांगितला. याशिवाय आजोबा, मावशीचे नंबर मात्र त्याला सांगता आले नाहीत. ते मोबाईलमध्ये असल्याचे सांगितले. सृष्टी जाधव हिला आई व बाबांचा नंबर तोंडपाठ होता. पण इतर नातेवाईकांचे नंबर मात्र माहीत नसल्याचे सांगितले. पोरांना किमान आई-बाबांचे तरी नंबर पाठ असल्याचे दिसून आले.
चौकट
पोरांना आठवतात, मोठ्यांना का नाही?
तरुण मुलांची स्मरणशक्ती मोठ्यापेक्षा अधिक असते. मध्यमवयीन व वृद्धांची स्मरणशक्ती कमी असते. त्यात त्यांच्या मनात अनेक गोंधळ उडालेले असतात. त्याला काही अपवादही असतात. त्यामुळे मोठ्यापेक्षा तरुणांना मोबाईल नंबरसह सर्वच गोष्टी लक्षात राहतात.- डाॅ. पवन गायकवाड, मानसोपचार तज्ज्ञ