लोकमत न्यूज नेटवर्क
संख : जत येथील सनमडीकर दवाखाना व आंबेडकर उद्यान शेजारील नागरिकांना १५ फुटांचा रस्ता खुला करून देण्यासाठी नागरिकांनी शनिवारी नगर परिषदेच्या दारात ठिय्या आंदोलन केले. तीन दिवसांत अतिक्रमणे हटविली नाही, तर अमरण उपोषण करण्याचा नागरिकांनी इशारा दिला आहे. या मागणीचे निवेदन प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे दिले.
अधिक माहिती अशी की, सनमडीकर दवाखाना व आंबेडकर उद्यान शेजारील रहिवासी हे गेली ६० ते ७० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. सनमडीकर दवाखान्याशेजारी नगर परिषदेचे सफाई कामगार, पाणीपुरवठा कर्मचारी, मोलमजुरी करून जगणारे गरीब लोक आहेत.
या ठिकाणी तीन पिढ्या राहत आहेत. या रहिवाशांना जाण्या-येण्यासाठी आंबेडकर उद्यानशेजारील डॉ. शरद पवार यांच्या दवाखान्यासमोरील १५ फुटी रस्ता आहे. या रस्त्यावर दुकान गाळे टाकल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी राहणाऱ्या ७०० रहिवाशांना जाण्या-येण्यासाठी रस्ता नाही. अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
नगर परिषदेने या रस्त्यावरील अतिक्रमणे तीन दिवसांत हटविले नाही तर अमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
ठिय्या आंदोलनात विशाल कांबळे, अमर कांबळे, बिरू हेगडे, फारुख मणेर, युसूफ शेख, आकाश राऊत, यल्लवा मासाळ, हेमा ऐवळे, वंदना चौगुले, वनिता जमदाडे यांच्यासह रहिवाशांनी सहभाग घेतला.
चौकट
आमदार फंडातून रस्ता मंजुरी
आंबेडकर उद्यानशेजारी रहिवाशांसाठी १५ फुटाचा रस्ता आमदार फंडातून मंजूर करण्यात आला आहे. हा रस्ता झाल्यास रहिवाशांच्या येण्या-जाण्याचा सोयी होणार. हा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे.
चौकट
रस्त्यावरील अतिक्रमणे हटविणार : शुभांगी बन्नेनवार
सनमडीकर दवाखान्याशेजारी राहणारे रहिवासी हे नगर परिषदेचे सफाई कामगार, पाणीपुरवठा कर्मचारी, मोलमजुरी करून जगणारे गरीब लोक आहेत. याचाच फायदा घेऊन रस्ता बंद केला आहे. या सामान्य लोकांना तीन दिवसात अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा करून दिला जाईल, असे आश्वासन नगराध्यक्षा शुंभागी बन्नेनवार यांनी दिले आहे.