आटपाडी : श्रमिक मुक्ती दल, समान पाणीवाटप संघर्ष चळवळ यांच्या लढ्याने आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या सहकार्याने आटपाडी तालुक्यात बंदिस्त पाईपलाईनद्वारे समन्यायी पाणीवाटप योजना कार्यान्वित झाली, असे प्रतिपादन आनंदराव पाटील यांनी केले.
मासाळवाडी लाईनवरील बंदिस्त पाईपलाईनमधून आलेल्या कृष्णा नदीच्या पाण्याचे पूजन यावेळी करण्यात आले. क्रांतिवीर नागनाथआण्णा नायकवडी, क्रांतिमाता इंदुताई पाटणकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. ढोलाच्या निनादात चळवळीच्या नेत्यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.
पाटील म्हणाले की, विसापूर येथील बंदिस्त पाईपलाईनच्या प्रयोगाला समोर ठेवून टेंभू योजनेचे सर्व पाणी समन्यायी आणि बंदिस्त पाईपलाईनने द्यावे, ही मागणी चळवळीने रेटून धरली. मागच्या सरकारने सगळे पाण्याचे स्त्रोत एकत्रित करून एकात्मिक समन्यायी वाटप करीत बंदिस्त पाईपलाईनने पाणी देण्याचा निर्णय घेतला. शासनाने आटपाडी तालुक्याला पायलट प्रोजेक्टसाठी निर्धारित करून पुढे काम केले. हे केवळ चळवळीच्या दीर्घ लढ्याचेच यश आहे.
समन्यायी पाणीवाटप आणि बंदिस्त पाईपलाईनचा प्रयोग आटपाडी तालुक्यात अखेरच्या टप्प्यात आला आहे. सांगोला आणि तासगावची तशीच फेरआखणी चालू आहे. आता सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये आटपाडी पॅटर्न सार्वत्रिक करावा, असे मत या लढ्याचे मुख्य प्रणेते डॉ. भारत पाटणकर यांनी दूरध्वनीवरून व्यक्त केले.
यावेळी आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती विजयसिंह पाटील, सादिक खाटीक, तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष दत्ता यमगर, राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस विजय पुजारी, मनोहर विभूते, भाऊसाहेब कुलकर्णी, विकास विभूते, महात्माजी पाटील उपस्थित होते.