कुपवाड : मानमोडी (ता. मिरज) येथील किराणा दुकानदार सोमनाथ दिलीप वनारसे यांना सांगलीतील खासगी सावकाराने व्याजाच्या पैशासाठी दमदाटी व शिवीगाळ करून धमकी दिली. कुपवाड पोलिसांनी आदगोंडा कल्लाप्पा गारे (रा. धामणी रोड, सांगली) या खासगी सावकारावर गुन्हा दाखल केला आहे.
मानमोडीतील दुकानदार वनारसे गारे याच्याकडून ८० हजार रुपयांचे कर्ज मासिक सात टक्के व्याजाने फेब्रुवारी २०२० मध्ये घेतले होते. त्यापोटी त्यांनी ४४ हजार ८०० रुपये व्याज व ८० हजार कर्जाची रक्कम असे एकूण १ लाख २४ हजार रुपये दिले होते. कर्ज घेताना तारण म्हणून बँकेचा कोरा धनादेश सही करून दिला होता. संशयित गारे याने त्या कोऱ्या धनादेशावर ९७ हजार रुपये लिहून तो बँकेत वठविण्याचा प्रयत्न केला होता. वनारसे यांनी कर्जाची मूळ रक्कम व व्याज दिल्यानंतर धनादेश परत करा, अशी मागणी केली. परंतु, गारे याने अजून नऊ हजार रुपये व्याजाची रक्कम दे, नाही तर सोडणार नाही, अशी दमदाटी व शिवीगाळ केली. अर्ज मागे घे, नाही तर न्यायालयात खटला दाखल करतो, अशी धमकी दिली. त्यानंतर वनारसे यांनी याबाबतची तक्रार कुपवाड पोलिसात दिली.