शिराळा : शिराळा विधानसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत भाजपचे शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक यांचा ३६६८ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सत्यजित देशमुख तिसऱ्या क्रमांकावर गेले. विजयानंतर मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.मतदानापासून कोणाचा विजय होणार, याबाबत मोठ्या प्रमाणात तर्कवितर्क, पैजा लावल्या गेल्या. आज (रविवारी) सकाळपासून मतमोजणी केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात सर्व गटांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. सकाळी ८.३0 च्या दरम्यान मतमोजणीस प्रारंभ झाला. यावेळी प्रथम टपाली मतदान मोजण्यात आले. यानंतर १४ टेबलांवर मतमोजणी सुरू झाली. पहिल्या फेरीपासूनच शिवाजीराव नाईक यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. ती शेवटपर्यंत होती. मतमोजणीवेळी ६ फेऱ्यांमध्ये मानसिंगराव नाईक यांनी मताधिक्य कमी केले. २00४ मध्ये झालेल्या निवडणुकीची पुनरावृत्ती झाली. दुपारी २.३0 च्या दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण साळुंखे यांनी शिवाजीराव नाईकहे ३६६८ मतांनी विजयी झाल्याचे घोषित करताच मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी केली. या मतदारसंघात प्रथमच ‘भाजप’चे एवढ्या प्रमाणात झेंडे दिसत होते. नाईक कुटुंबियांनीही मोठा जल्लोष केला. शिराळा शहरातून कार्यकर्त्यांनी मोटारसायकलींवरून घोषणा देत आपला आनंद व्यक्त केला. नाईक यांच्या विजयावेळी सम्राट महाडिक, राहुल महाडिक, सुखदेव पाटील आदींनी त्यांचा सत्कार केला. मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आताषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. (वार्ताहर)साहेब शेतकऱ्यांना निश्चित न्याय देतीलगेली पाच वर्षे आमच्याकडे सत्ता नव्हती, तरीही नागरिकांची विविध विकास कामे केल्याने शिवाजीराव नाईक (साहेब) हे निवडून आले आहेत. आता शेतकरी, महिला, युवक यांना विकासाची योग्य दिशा भाजपच्या सत्तेपासून देण्याचा प्रयत्न करतील. सर्व घटकाचा विकास करू, अशी प्रतिक्रीया आमदार शिवाजीराव नाईक यांच्या पत्नी सुनंदा नाईक यांनी दिली.क्षणचित्रे१४ टेबलवर २४ फेऱ्यांमध्ये व टपाली मतदान अशी मतमोजणी करण्यात आली.दुसऱ्या फेरीवेळी कासेगाव बूथ क्र. १५ चे मतदान यंत्र मतमोजणीवेळी बंद पडले. त्यामुळे एक तास या फेरीचा निकाल लागला नाही. मतदारसंघात पक्षाबरोबर गटही महत्त्वाचे आहेत, हे पुन्हा एकदा सिध्द झाले.मतमोजणीवेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.मतदानाचा टक्का वाढल्याचा फटका मानसिंगराव नाईक यांना बसल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली होती.४शिराळा तालुक्यात दोन गट आले तरच शिवाजीराव नाईक यांचा पराभव करू शकतात, अन्यथा ते शक्य नसल्याचे निकालावरून स्पष्ट दिसले आहे.४वाळवा तालुक्यातून शिवाजीराव नाईक यांना तीन हजार ५०९, तर शिराळा तालुक्यातून केवळ १५९ मतांचे मताधिक्य मिळाले आहे.औद्योगिक विकासाला चालना देणारचुरशीच्या लढतीत विकासासंदर्भात भाजपची भूमिका मतदारांपुढे मांडली. या भूमिकेला मतदारांनी साथही दिली. तरुण महिला, शेतकरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. हा विजय कुणाच्या पराभवाचा अथवा कुणाला कमी लेखण्याचा नसून, सर्वांगीण विकासासाठीचा आहे. वाकुर्डे योजना, चांदोली पर्यटनक्षेत्र, शिराळा एमआयडीसी आदी अनेक महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी आहे. पाच वर्षांची पीछेहाट भरून काढू. उद्योग, शिक्षण, आरोग्य आदी विकास कामे मोठ्या प्रमाणात निधी आणून पूर्ण करणार आहे.-शिवाजीराव नाईक, भाजप उमेदवार, शिराळा.कामे करतच राहूगेल्या पाच वर्षात मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये विकास कामे पोहोचवली आहेत. तरीही मतदारांनी दिलेला कौल मान्य करून यापुढेही कामे करीतच राहणार आहे.-मानसिंगराव नाईक, राष्ट्रवादी उमेदवार, शिराळा.कॉँग्रेस मजबूत करणारशिराळा विधानसभा मतदारसंघात विकास कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढे जनतेच्या समस्या सोडवून काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करणार आहे. -सत्यजित देशमुख, काँग्रेस, उमेदवार, शिराळा.
शिवाजीराव नाईकांचीच अखेर बाजी
By admin | Updated: October 20, 2014 00:42 IST