लाेकमत न्यूज नेटवर्क
तासगाव : वंजारवाडी (ता. तासगाव) गावचे सुपुत्र, कोकण विभागाचे निवृत्त महसूल आयुक्त शिवाजीराव रघुनाथराव दौंड (वय ६०) यांचे बुधवारी वंजारवाडी येथे घरी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
शिवाजीराव दौंड १९९७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते. २५ वर्षे सेवा बजावून ते निवृत्त झाले होते. सामान्य प्रशासन विभागाचे सचिव, विशेष चौकशी अधिकारी, जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य माहिती आयोगाचे सचिव, मत्सोद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, खादी ग्रामोद्योगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अशा विविध पदांवर त्यांनी काम केले होते. काेराेना काळात त्यांनी कोकण विभागासाठी विशेष कामगिरी केली होती. मराठा आरक्षणप्रश्नी शासनाच्या वतीने अहवाल तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.