सांगली : कोरोना आणि लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत झाला. शिवाजी पुतळ्याजवळ गुरुवारी संध्याकाळी बैठक झाली.
शिवजयंतीसंदर्भात पोलिसांकडून कोणालाही अद्याप अधिकृत परवानगी मिळालेली नाही. याविषयी बैठकीत चर्चा झाली. कार्यक्रमांचे नियोजन ठरले. १८ फेब्रुवारीला मध्यरात्री बारा वाजता जन्मकाळ होईल. १९ फेब्रुवारीस रॅली, शिवज्योत आदी कार्यक्रम होतील. या सर्व कार्यक्रमांची माहिती पोलिसांना दिली जाईल. त्यांच्या परवानगीसाठी उत्सव थांबणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.
बैठकीला उत्तम जाधव, अनिल लाळगे, अनिकेत शिंदे, अजय देशमुख, सौरभ भोसले, नितीन चव्हाण आदी उपस्थित होते.
चौकट
ट्रॅक्टर रॅलीला परवानगी, शिवजयंतीला का नाही ?
कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, ट्रॅक्टर रॅलीला परवानगी मिळते, मग शिवजयंतीच्या रॅलीची अडवणूक कशासाठी, आमची रॅली पायी निघणार आहे, त्यामुळे परवानगी मिळालीच पाहिजे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्रे दिली आहेत.