शिराळा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दहा महिने गजबजलेले उपजिल्हा रुग्णालय नववर्षावर कोरोनामुक्त झाले होते. मात्र पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने या रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे येथील रुग्णालय पुन्हा जुन्या इमारतीत हलविण्यात आले आहे.
तालुक्यात सध्या ७५ रुग्ण घरी, पाच रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात, तर एक रुग्ण मिरज कोविड रुग्णालयात उपचार घेत आहे. आता पुन्हा उपजिल्हा रुग्णालयात आणखी रुग्ण दाखल होऊ शकतात. येथे सर्व बेड्स ऑक्सिजन बेड्स आहेत. येथील सहा केएल क्षमतेचा ऑक्सिजन टॅंक, ड्युरा सिलिंडर, ३७ जम्बो सिलिंडर पूर्ण क्षमतेने भरून ठेवण्यात आले आहेत.
मंगळवारी तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जे. के. मोमीन, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, डॉ. अनिरुद्ध काकडे यांनी कोविड रुग्णालयाची पाहणी केली. याठिकाणी कोविड रुग्णालय सुरू केल्याने येथील इतर रुग्णांवर उपचाराकरिता जुन्या ग्रामीण रुग्णालयाच्या लहान जागेत रुग्णालय सुरू केले आहे. आमदार मानसिंगराव नाईक यांनी येथील रुग्णालयात ऑक्सिजन बेड, ऑक्सिजन टॅंक, व्हेंटिलेटर यांची तातडीने सोय केली. यामुळे रुग्णांसाठी मोठी सोय झाली आहे.