वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथे रामोसदरा परिसरात सायंकाळी पाचच्या दरम्यान मेंढपाळावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. रामोसदरा परिसरातील मेंढपाळ तानाजी विलास चव्हाण हे रविवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान शेळ्या व मेंढ्या घरी घेऊन जात असताना बिबट्याने त्यांच्यावरच हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या हात, पाय व छातीवर जखमा झाल्या. तानाजी चव्हाण व त्यांच्याबरोबर असलेला मेंढपाळ यांनी प्रतिकार केल्याने ते बचावले. चव्हाण यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.काही दिवसांपूर्वीच कृषी अधिकारी मधुकर घाटगे यांच्यावरही त्याच परिसरात बिबट्याने हल्ला केला होता. परंतु सतर्कतेमुळे ते बचावले होते. वाटेगाव येथील रामोसदरा परिसरात बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून नेर्लेकरदरा परिसरात निवृत्त कृषी अधिकारी मधुकर घाटगे यांच्या आंब्याच्या बागेत त्यांना बिबट्या असल्याचे निदर्शनास आले होते. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी, मागणी येथील शेतकऱ्यांकडून होत आहे.
बिबट्याचा बंदोबस्त करावाया परिसरात बिबट्याने पाळीव प्राण्यांवर वारंवार हल्ले केले आहेत. परंतु बिबट्याने रविवारी माणसावर हल्ला केला आहे. या परिसरात पाळीव प्राण्याबरोबर माणसेही असुरक्षित आहेत. संबंधित वनविभागाने तातडीने या परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सापळा लावावा, अशी मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे. यापूर्वी याबाबत वनविभागाला कल्पना देऊनही वनविभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. - मधुकर घाटगे, निवृत्त कृषी अधिकारी, वाटेगाव