सांगली : सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर गोरे बुधवारी, २ नोव्हेंबररोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी दिली. दरम्यान, राष्ट्रवादीने क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरूण लाड व विद्यमान आमदार प्रभाकर घार्गे यांनाही डमी म्हणून अर्ज दाखल करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार शुक्रवारी लाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून अर्ज नेला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील अशा दिग्गजांची यावेळी उपस्थिती होती. काँग्रेसमध्ये पतंगराव कदम-वसंतदादा गटात वाद पेटला आहे. दरम्यान, मोहनराव कदम यांनी शुक्रवारी नगरसेवकांच्या गाठीभेटी सुरु केल्या. त्यांचे नातू जितेश कदम यांनी महापौर हारूण शिकलगार यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली. राष्ट्रीय समाज पक्षातून राष्ट्रवादीत दाखल झालेले शेखर गोरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याने, ते केव्हा अर्ज दाखल करतात, याची चर्चा सुरू आहे. गोरे २ नोव्हेंबररोजी अर्ज दाखल करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी शुक्रवारी सांगितले. गोरे यांच्यासोबतच क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरूण लाड व विद्यमान आमदार प्रभाकर घार्गे हेही अर्ज दाखल करणार आहेत. लाड व घार्गे यांचे अर्ज डमी असल्याचे राष्ट्रवादीतून सांगितले जात आहे. दरम्यान, लाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून अर्ज नेताच उलटसुलट चर्चा रंगली होती, पण जिल्हाध्यक्ष शिंदे यांच्या स्पष्टीकरणानंतर ही चर्चा हवेत विरली. शुक्रवारी सायंकाळी विशाल पाटील गटाची बैठक झाली. या बैठकीत शेखर माने यांनी अर्ज दाखल करण्याचा निर्णय झाला. माने शनिवारी अर्ज दाखल करतील, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)आवटी, बागवान यांच्या अर्जावर आज सुनावणीमहापालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक सुरेश आवटी व राष्ट्रवादीचे मैनुद्दीन बागवान यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने त्यांचा मतदारयादीत समावेश करण्यात आलेला नाही. दरम्यान, या दोन्ही नगरसेवकांनी सर्वोच्च व उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. न्यायालयाने नगरसेवक पद रद्द करण्याच्या निकालाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळावा, यासाठी दोघांनीही जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे अर्ज केला आहे. त्यावर शनिवारी सुनावणी होत आहे. दिवाळी आहे... : टोकन तरी द्या!दिवाळीच्या तोंडावर विधानपरिषदेची निवडणूक जाहीर झाल्याने नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा भाव वधारला आहे. दिवाळीत लक्ष्मी प्रसन्न होणार, म्हणून नगरसेवकांचे चेहरे फुलले आहेत. शुक्रवारपासून काहींनी उमेदवारांच्या जवळच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून, ‘आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहोत, तोंडावर दिवाळी आहे, किमान टोकन तरी द्या’, असे साकडे घातल्याची चर्चा सुरू आहे.
शेखर गोरे बुधवारी अर्ज भरणार
By admin | Updated: October 29, 2016 00:18 IST