विटा : विटा नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या गुरूवारी चौथ्या दिवशी कॉँग्रेस, शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष व भाजपमधून नगराध्यक्ष पदासाठी तीन, तर नगरसेवक पदासाठी ४३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. विद्यमान आ. अनिल बाबर यांच्या स्नुषा डॉ. सौ. शीतल अमोल बाबर यांनी गुरूवारी शिवसेनेतून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. नगरसेवक पदासाठी कॉँग्रेसमधून विद्यमान नगराध्यक्ष वैभव पाटील, अशोकराव गायकवाड यांचे चिरंजीव अॅड. अजित गायकवाड यांच्यासह कॉँग्रेस, शिवसेना, रासप व भाजपतून ४३ अर्ज दाखल झाले.गुरूवारी अर्ज दाखल करण्याचा चौथा दिवस होता. बुधवारी नगराध्यक्ष पदासाठी कॉँग्रेसमधून सौ. जयश्री पाटील व त्यांच्या स्नुषा सौ. प्रतिभा पाटील यांनी अर्ज दाखल केला होता, तर कॉँग्रेसमधूनच प्रभाग क्र. ८ साठी अॅड. सुमित गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. गुरूवारी शिवसेनेतून डॉ. सौ. शीतल बाबर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर सत्ताधारी कॉँग्रेस, शिवसेना, रासप व भाजपमधून ४२ उमेदवारी अर्ज दाखल झाले.गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांत प्रामुख्याने कॉँग्रेसचे विद्यमान नगराध्यक्ष वैभव पाटील, पृथ्वीराज पाटील, पद्मसिंह पाटील, माजी उपनगराध्यक्षा सौ. मालती कांबळे, माजी नगराध्यक्षा सौ. मीनाक्षी पाटील, तर शिवसेनेतून सविता जाधव, जयश्री मेटकरी, अमोल मंडले, नीलम पाटील, रामचंद्र भिंगारदेवे, वैभव म्हेत्रे यांचा समावेश आहे. भाजपमधून नगरसेविका सौ. रूपाली मेटकरी, नीलम बाबर आणि राष्ट्रीय समाज पक्षातून प्रणव हारूगडे, सुधीर शेळके या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे विटा पालिकेसाठी सत्ताधारी कॉँग्रेसचे २०, शिवसेना १७, राष्ट्रीय समाज पक्ष ४ व भारतीय जनता पक्षातून २, असे ४३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. (वार्ताहर)
नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेतून शीतल बाबर
By admin | Updated: October 27, 2016 23:25 IST