इस्लामपूर : येथील पेठ रस्त्यावरील लक्ष्मी-नारायण कोविड उपचार केंद्रात बेकायदा जमाव जमवून जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या आदेशाचा भंग करून त्यातील डॉक्टर, त्यांची पत्नी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ दमदाटी करीत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या इतर रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी येथील संघर्ष समितीचे नेते शाकीर तांबोळी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील न्यायालयाने फेटाळून लावला.
लक्ष्मी-नारायण रुग्णालयात कापूसखेड येथील धोंडीराम वसंत पाटील यांच्यावर उपचार सुरू होते. तेथे उपचार सुरू असताना, २ मे रोजी त्यांचे निधन झाले. त्यामुळे मृताचे कुटुंबीय आणि तांबोळी यांच्यासह ५० ते ६० जणांनी रुग्णालयात जाऊन उपचार चांगले केले नाहीत. उपचारात हलगर्जीपणा केला, असे आरोप करून रुग्णालयातील साहित्याची आदळआपट केली होती. याबाबत डॉ.सचिन सांगरुळकर यांनी पोलिसात फिर्याद दिली होती.
तांबोळी यांनी आपली अटक टाळण्यासाठी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्याच्यावर दुुसरे न्यायाधीश सतीश चंदगडे यांच्यासमोर सुनावणी झाली. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रणजीत पाटील यांनी अर्जदार हा पांढरपेशा असून, त्याची पार्श्वभूमी गंभीर स्वरूपाची आहे. त्याच्या चेतावणीवरूनच हा गुन्हा घडलेला आहे. यापूर्वी त्याच्यावर खंडणीचा गुन्हाही नोंद आहे. तांबोळी यांना अटक करून उर्वरित संशयितांची नावे निष्पन्न करून, त्यांनाही अटक करायची असल्याने हा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर करावा, अशी मागणी केली. त्यावर न्यायालयाने तांबोळी यांचा अर्ज फेटाळून लावला.