मिरज : मिरज-बेडग रस्त्यावरील ग्रामस्थांच्या आरोग्याला अपायकारक ठरणारा कत्तलखाना आठ दिवसात बंद न केल्यास कत्तलखाना पेटवून देऊन आत्मदहन करू, असा इशारा मिरज पंचायत समितीचे प्रभारी सभापती अनिल आमटवणे, सदस्य किरण. बंडगर, बोलवाडचे सरपंच सुहास पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला.
महापालिकेच्या कत्तलखान्याविरोधात दगडफेक आंदोलन होणार होते. याअनुषंगाने महापालिकेचे सहायक आयुक्त दिलीप घोरपडे, आरोग्य अधिकारी सुनील आंबोळे, तसेच पंचायत समितीचे प्रभारी सभापती अनिल आमटवणे, सदस्य किरण बंडगर, गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांच्या उपस्थितीत पंचायत समितीत बैठक पार पडली.
बैठकीत उपायुक्त घोरपडे व आरोग्य अधिकारी आंबोळे यांनी कत्तलखान्याच्या विषयावर आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र या विषयावर पंचायत समितीचे प्रभारी सभापती अनिल आमटवणे, सदस्य किरण बंडगर व बोलवाडचे सरपंच सुहास पाटील हे आक्रमक बनले. कत्तलखानाप्रश्नी नेहमी बैठकांचा फार्स होतो, निर्णय मात्र होत नाही. कत्तलखान्यास व्यावसायिकरणाचे स्वरूप दिल्याने शहरासह परराज्यांतील जनावरे कतलीसाठी आणली जात आहेत. याचा दुष्परिणाम ग्रामीण जनतेच्या आरोग्यावर होत आहे. प्रदूषणाने तिघांचा बळी गेला असल्याने, बैठकांचा फार्स न करता तो बंद करावा, आठ दिवसात तो बंद न केल्यास ग्रामीण भागातील जनता व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कत्तलखाना पेटवूच, त्याचबरोबर आपण त्यामध्ये आत्मदहनही करू, असा इशारा आमटवणे, बंडगर व पाटील यांनी दिला.
चाैकट
कत्तलखान्यातच बैठक घ्या !
कत्तलखान्यामुळे ग्रामीण जनतेच्या आरोग्यावर काय परिणाम होतात, हे अधिकाऱ्यांना माहीत नाही. यासाठी महापालिका आयुक्तांनी चर्चा करण्यासाठी कत्तलखान्यातच बैठक घ्यावी, असे आव्हान अनिल आमटवणे, किरण बंडगर, सुहास पाटील यांनी दिले.