कडेगाव : ताकारी योजनेच्या वितरिका क्रमांक-२चे काम अंतिम टप्प्यात आहे. आता या वितरिकेच्या चाचणीची लाभक्षेत्रात उत्सुकता आहे. दि. १५ फेब्रुवारी रोजी योजनेचे आवर्तन सुरू झाल्यावर चाचणी होण्याची शक्यता आहे.
कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे, कुंभारगाव व खानापूर तालुक्यातील जाधवनगर, बलवडी तसेच पलूस तालुक्यातील कुंडलचा काही भाग व कोयना वसाहत, पलूस व आंधळी आदी गावांच्या २४०४ हेक्टर लाभक्षेत्राला बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी देण्यासाठी ११ कोटी ८२ लाख रुपये खर्चाच्या या वितरिकेचे काम लवकरच पूर्ण होत आहे. किरकोळ कामे अपूर्ण आहेत. ती तातडीने करण्याच्या सूचना ठेकेदारांना दिल्या आहेत.
बंदिस्त पाइपलाइनद्वारे नऊ किलोमीटर लांबीची मुख्य वितरिका व १६ किलोमीटर लांबीच्या उपवितरिकेद्वारे पाणी दिले जाणार आहे. यामुळे भूसंपादनाचा विषयच राहिलेला नाही. बंदिस्त पाइपलाइनसाठी खुदाई करताना होणारी शेतकऱ्यांची पीक व अन्य नुकसानभरपाई शासनाकडून काही जणांना मिळाली आहे.
मुख्य वितरिकेला जोडलेल्या उपवितरिकाद्वारे
लाभक्षेत्रातील आठ गावांमधील वेगवेगळ्या २८ ठिकाणच्या शिवारात जागोजागी चेंबरद्वारे ८० ते १०० हेक्टर शेतजमिनीला पाणी मिळणार आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. काम कितपत दर्जेदार झाले आहे, हे चाचणीनंतरच समजणार आहे.
चौकट :
सर्वपक्षीय नेत्यांचे योगदान
माजी मंत्री दिवंगत पतंगराव कदम यांनी या वितरिकेसाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनीही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे प्रयत्न केले होते. आमदार अरुण लाड तसेच श्रीकांत लाड यांनी धडक मोर्चा काढला होता. आमदार मोहनराव कदम व राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी या कामाचा आढावा घेतला होता.
फोटो : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) हद्दीत
मुख्य कालव्याद्वारे आलेले पाणी येथून
वितरिका क्रमांक दोनला दिले जाणार आहे.